
कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये 50 लाख रुपये जिंकून प्रसिद्धीझोतात आलेल्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 2021 मधील 2.57 कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
2021 मध्ये अमिता सिंह तोमर या श्योपूर जिल्ह्यातील बडोदा तहसील येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी आलेल्या भीषण पूरानंतर 794 बाधितांना मदत राशी दिली जाणार होती. तपासात असे समोर आले की तहसील प्रशासनाने 127 बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करून सरकारी निधीचा अपहार केला. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक बँक खाती ही त्या तहसील क्षेत्राच्या बाहेरील होती.
110 आरोपी, 23 महसूल अधिकारी अटकेत
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 22 पटवारी आणि अमिता सिंह तोमर यांच्यासह एकूण 23 महसूल अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. या गुन्ह्यात एकूण 110 जणांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भादवि कलम 420, 467 आणि 468, 409 आणि120-बी (फौजदारी कट) यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नाट्यमय घडामोडी
अमिता सिंह तोमर या सध्या विजयपूर येथे तहसीलदार होत्या मात्र या प्रकरणामुळे जिल्हाधिकारी अर्पित वर्मा यांनी बुधवारीच त्यांना पदावरून हटवले होते. त्या अनेक दिवसांपासून ड्युटीवर गैरहजर होत्या. अखेर बडोदा एसडीओपी अवनीत शर्मा यांच्या पथकाने त्यांना ग्वाल्हेर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. श्योपूरचे पोलीस अधीक्षक सुधीर कुमार अग्रवाल यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
न्यायालयाने फेटाळला होता जामीन
अटकेपासून वाचण्यासाठी तोमर यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र दोन्ही न्यायालयांनी तोमर यांचे अपील फेटाळून लावले होते. अटकेनंतर गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांची रवानगी शिवपुरी येथील तुरुंगात करण्यात आली आहे.

























































