कल्याण, डोंबिवलीतील 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यावर अखेर आज राज्य शिक्कामोर्तब केले. नगरविकास विभागाने आज यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून ‘कल्याण उपनगर’ या नावाने ही नगरपरिषद अस्तित्वात येईल. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसोबतच ‘कल्याण उपनगर’ नगरपरिषदेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याची सूचना दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला केली होती. त्यामुळे 27 गावांतून वगळलेल्या 18 गावांचे काय होणार असा प्रश्न नागरिकांना पडला होता. मात्र आता या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा शासनाने निर्णय जाहीर केल्याने संदिग्धता संपुष्टात आली आहे. आता 27 गावांतील उर्वरीत 9 गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत असतील यावरही शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या दोन्ही पालिकांच्या निवडणुका आता एकत्रच होणार आहेत.

ही आहेत 18 गावे

घेसर, हेदूटणे, उंबार्ली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे या गावांचा नवीन कल्याण उपनगर नगरपरिषदेत समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या