
ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीत भाजप, शिंदे गटाचे २७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र अशा पद्धतीने निवड जाहीर करण्याऐवजी या उमेदवारांविरोधात ‘नोटा’चा पर्याय द्या असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केले आहे. पारदर्शक लोकशाहीसाठी बिनविरोध प्रक्रियेपेक्षा जनतेने दिलेला कौल अधिक महत्त्वाचा आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गट व भाजपचे २० उमेदवार तर ठाण्यात सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाने किरकोळ कारणे दाखवून विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करून हा गोलमाल केल्याचा आरोप शिवसेना व मनसेने केला आहे. याविरोधात ठाण्यात दोन्ही पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत शुक्रवारी जोरदार आंदोल न केले होते. दरम्यान, आज ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही ट्विट करत निवडणूक प्रक्रियेवर आणि बिनविरोध आलेल्या उमेदवारांवर जोरदार टीका केली आहे. ईव्हीएम मशीनवर ‘नोटा’चा पर्याय दिलेला आहे.
ज्या मतदारांना एकही उमेदवार पसंत नसतो त्यांना ‘नोटा’ दाबण्याचा अधिकार आहे. मग विरोधी पक्षांचे अर्ज बाद केल्यानंतर सत्ताधारी उमेदवारांना कोणत्या आधारावर बिनविरोध जाहीर करण्यात आले असा सवाल दिघे यांनी विचारला आहे. बिनविरोध आलेल्या उमेदवारांविरोधात ‘नोटा’चा पर्याय देऊन मतदार राजाला मतदानाचा हक्क द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
- निवडणूक आयोगाने तथाकथित बिनविरोध उमेदवारांना थेट विजयी घोषित न करता, त्यांना ‘नोटा’ या पर्यायासमोर उभे करावे.
- किती मतदार त्या उमेदवाराच्या विरोधात आहेत, हे ‘नोटा’च्या मतदानामुळे स्पष्ट होईल.
‘आप’ने उठवला आवाज
आम आदमी पक्षानेही या सर्व प्रकारावर टीका करत बिनविरोध झालेल्या उमेदवारांसमोर ‘नोटा’ला उमेदवार म्हणून दर्जा द्या अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आपच्या निवडणूक समितीचे कल्याण-डोंबिवली येथील सल्लागार अॅड. आकाश वेदक यांनी ही मागणी केली आहे.

























































