
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने विवाह सोहळा आणि गर्दी होणाऱ्या इतर समारंभांसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्नाच्या पंगतीत गप्पा मारू नये असे आदेशच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
सुरक्षित वावर राखला जावा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच हे नवे आदेश देण्यात आले आहेत.
लग्नसमारंभाला उपस्थित राहणाऱया लोकांची मर्यादा 50 आहे. त्यात वाजंत्री, भटजीपासून आचारी आणि मदतनीस यांचीही गणना केली जाणार आहे. उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी लग्नसोहळय़ापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याची अट घालण्यात आली असून लग्न झाल्यावर त्याच्या चित्रीकरणाची सिडी पाच दिवसांत पोलीस ठाण्यात जमा करावी लागणार आहे.
समारंभाला येणाऱया प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधन घालण्यात आले असून सॅनिटायझर आणि येणाऱयाच्या शरीरातील तापमान मोजणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे कार्यालय मालक किंवा व्यवस्थापक यांना सांगण्यात आले आहे. लग्नाच्या पंगतीत प्रत्येकी सहा फुटांवर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मास्क काढल्यावर जेवणाऱयांनी एकमेकांशी गप्पा मारू नयेत असे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.
परवाना रद्द, गुन्हा दाखल
ग्रामीण भागातील लग्न सोहळय़ावर नजर ठेवण्यासाठी पोलीस, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांचे भरारी पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले असून नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा आणि कार्यालयाचा परवाना रद्द करा असेही बजावले आहे.





























































