नाटक हा जिवंत अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री कीर्ती अडारकर यांच्या मते अभिनय क्षेत्रात वयाची मर्यादा नसते. कलाकार कोणत्याही टप्प्यावर आपली कारकीर्द सुरू करू शकतो. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येक गटाची अभिनय क्षेत्रात गरज असते. मात्र यासाठी आपली भूमिका चोखपणे पार पाडण्याचं कसब कलाकाराकडे असायलाच हवं.

कीर्ती अडारकर यांना कॉलेजपासूनच अभिनयाची आवड होती. डिग्रीच्या पहिल्या वर्षापासूनच त्या नाटकांमध्ये काम करत. कीर्तींच्या मते, ‘नाटक हा एक जिवंत अनुभव असतो. तो प्रत्येक कलाकाराने अनुभवायला हवा.’ कीर्ती अडारकर यांचे पहिले नाटक ‘गुड बाय डॉक्टर’. पुढे त्यांना ‘गोष्ट जन्मांतरींची’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. लग्नानंतर काही वर्षे त्या संसारातच रुळल्या, परंतु पुढे परिस्थितीनुसार त्यांनी अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करायचे ठरविले. तेव्हा कीर्ती यांना पहिला चित्रपट मिळाला ‘द रिबेलीयस फ्लॉवर.’ यात त्यांनी ओशो रजनीश यांच्या आजीची भूमिका साकारली होती. या भूमिकेची प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा करण्यात आली. यानंतरचा ‘बार बार देखो’ हा त्यांच्या करीअरचा निर्णायक टप्पा ठरला. ‘नीरजा’, ‘अकिरा’ या हिंदी ‘वेंटिलेटर’, ‘भिकारी’ या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘पेशवा बाजीराव’ या मालिकेमध्ये राणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे.

कीर्तींच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबाने त्यांना खूप मदत केली. कीर्तींच्या मते आपले कुटुंबच आपला खरा आधार असतो. अभिनयाला वयोमर्यादा नसते, परंतु शरीर स्वस्थ्य असणे खूप गरजेच असते. म्हणूनच कीर्ती या मेडिटेशनच्या आणि व्यायामाच्या सहाय्याने त्यांचे शरीर स्वस्थ्य ठेवतात.

कीर्ती अडारकर यांच्यासाठी त्यांच्या आई दैवत आहेत आणि त्या त्यांच्यासोबत अजूनही आहेत हे त्यांच्या मते त्यांचे भाग्यच आहे. त्या म्हणतात, कुठल्याही क्षेत्रात मेहनत आणि अनुभवाला कोणताही पर्याय नाही. म्हणूनच, आधी शिक्षण पूर्ण करूनच अभिनय क्षेत्रात सामील व्हा.

तरुण पिढीसाठी कीर्ती अडारकर उत्तम उदाहरण आहेत की, जिथे तुमची इच्छा असते तिथे मार्ग हा मिळतोच. मग तो जीवनाचा कुठलाही टप्पा असो.

प्रगती करंबळेकर,
म. ल. डहाणूकर कॉलेज