
परळच्या केईएम रुग्णालय व मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करणाऱया एका कर्मचाऱयाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली, तर एक फरार आहे. हे दोघे संस्थेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होते. त्यांनी माजी अधिष्ठातांच्या बनावट स्वाक्षऱया करून ही रक्कम लांबवली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील केईएम रुग्णालयाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने 1991 रोजी तत्कालीन प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाची स्वायत्त संस्था स्थापना केली. या संस्थेद्वारे प्रामुख्याने वैद्यकीय संशोधन व अनुषंगिक सहकार्य करण्याचे कार्य केले जाते. या स्वायत्त संस्थेच्या निधीमध्ये संस्थेचे कंत्राटी कर्मचारी असणाऱयांनी अपहार केल्याचे लक्षात येताच लेखपाल श्रीपाद देसाई व लिपिक राजन राऊळ यांच्याविरोधात भोईवाडा रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱयांना ट्रस्टच्या कामातून आधीच काढून टाकण्यात आले आहे. यापैकी राजन राऊळ याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली, तर दुसरा आरोपी श्रीपाद देसाई फरार आहे.
घोटाळय़ातील निधी हा पालिका-केईएमचा नाही
आर्थिकदृष्टय़ा व प्रशासकीयदृष्टय़ा ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ ही पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे. संस्थेच्या कामांसाठी महापालिकेचा किंवा केईएम रुग्णालयाच्या कोणताही निधी उपयोगात आणला जात नसून संस्थेला मिळणाऱया देणग्यांमधून या संस्थेचे कामकाज चालते. संस्थेच्या विश्वस्त मंडळावरील सर्व व्यक्ती या मानद ‘विश्वस्त’ असून त्या स्वयंसेवक म्हणून संस्थेचे काम बघतात, अशी माहिती संस्थेचे मानद अध्यक्ष व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिली.



























































