
कडेगाव येथील केन ऍग्रो साखर कारखान्याने जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जापैकी पहिला हप्ता 18 कोटी 83 लाख रुपये भरला आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांनी थकीत कर्ज परतफेडीकडे पाठ फिरवली असताना केन ऍग्रो कारखान्याकडील थकबाकी बॅँकेने व्याजासह वसूल केली आहे. त्यामुळे बॅँकेला काहीसा दिलासा मिळाला. कारखान्याकडून पुढचा हप्ता मार्च 26मध्ये भरला जाणार आहे.
सांगली जिल्हा बॅँकेने कडेगाव येथील केन ऍग्रो एनर्जी (इंडिया) लि. रायगाव या कंपनीच्या साखर कारखान्याला कर्ज पुरवठा केला होता. या कारखान्याकडे मार्च 2022 अखेर व्याजासह 225.55 कोटींची थकबाकी होती. याप्रकरणी राष्ट्रीय कंपनी लवादाने कारखाना व जिल्हा बॅँकेच्या सहमतीनंतर कर्जवसुलीचा ऍक्शन प्लॅन मंजूर केला. त्यानुसार कारखान्याने व्याजासह पुढील सात वर्षांत थकीत कर्ज फेडायचे आहे. या कर्जाचा पहिला हप्ता मार्च 2025मध्ये भरणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीकडून वेळेत भरणा न झाल्याने बॅँकेने यावर व्याजाची आकारणी सुरू केली होती.
कंपनीचे संस्थापक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हा बॅँकेचे सीईओ शिवाजीराव वाघ यांची भेट घेत कंपनीने लवादाने दिलेल्या निर्णयानुसार थकीत कर्ज फेडणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार पहिल्या हप्त्याचे 18.83 कोटी रुपये दोन टप्प्यांत कंपनीने जिल्हा बॅँकेत भरले आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या केन ऍग्रोच्या कर्जाची वसुली सुरू झाली आहे.
विलंब झाल्याने व्याज आकारणी – शिवाजीराव वाघ
सांगली जिल्हा बॅँकेचे सीईओ शिवाजीराव वाघ म्हणाले, केन ऍग्रो कंपनीकडे जिल्हा बॅँकेची 225 कोटींची थकबाकी आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने या कर्जाच्या वसुलीसाठी सात वर्षांचा ऍक्शन प्लॅन मंजूर केला आहे. त्यानुसार कंपनीकडून 18 कोटींचा पहिला हप्ता भरण्यास काही दिवस विलंब झाला. मात्र, बॅँकेने या विलंब झालेल्या दिवसांवरही व्याज आकारणी केली आहे. सदरचा पहिला हप्ता जमा झाला असून, मार्च 26 मध्ये ठरल्याप्रमाणे दुसरा हप्ता वसूल होणार आहे.

























































