केरळ स्फोटात आयईडीचा वापर, एका आरोपीची शरणागती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या ऐर्नाकुलम येथे एका कन्वेंशन सेंटरमध्ये रविवारी सकाळी तीन मोठे स्फोट झाल्याने खळबळ माजली आहे. या स्फोटात एक जण ठार तर 40 जण जखमी झाले. या स्फोटाची माहिती मिळताच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केरळ पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेच्या प्राथमिक तपासानंतर या स्फोटात आयईडी आणि इन्सेंडियरी डिव्हाईस यांचा वापर केला गेला आहे. स्फोटकांना एका टिफीन बॉक्समध्ये ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून कुणाला कळू नये.

ऐर्नाकुलम येथील कलामसेरी येथे हे कन्वेंशन सेंटर आहे. या ठिकाणी रविवारी या ठिकाणी ज्यू धर्मीय लोक प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. त्याच ठिकाणी एका पाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे एकाचा मृत्यू झाला तर 40हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेमागे कोण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट या हॉलच्या मधोमध झाला. यावेळी हॉलमध्ये सुमारे शंभर ते दीडशे लोक जमले होते.

या स्फोटानंतर एका संशयिताने त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलीस स्टेशनमध्ये शरणागती पत्करत हा स्फोट आपण घडवून आणल्याचं म्हटलं आहे. या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे केरळ पोलिसांनी अद्याप या संशयित आरोपीबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. या स्फोटानंतर संपूर्ण राज्याला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसंच 14 जिल्ह्यांमध्ये पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही नजर ठेवण्यात येत आहे. अफवा पसरवणाऱ्या, सामजिक तणाव निर्माण करणाऱ्या आणि असंवेदनशील पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा केरळ पोलिसांनी दिला आहे.