
पाककला हे मोठय़ांचं काैशल्य असतं. मुलांना तर गॅसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र केरळचा 9 वर्षांचा शेफ हयान अब्दुल्ला याने कमालच केली. एवढय़ा लहान वयात हयानने एका तासात 172 डिश बनवून विश्वविक्रम केला आहे. हयानची आशिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे.
कोझिकोडच्या हयान अब्दुल्ला याला कुकिंगची आवड आहे. हयान जेव्हा चार वर्षांचा होता तेव्हापासूनच मला स्वयंपाकात हातभार लावतोय, असं त्याची आई राशा अब्दुल्ला यांनी सांगितले, म्हणून इतक्या कमी वेळात त्याने पॅनकेक, बिर्याणी, ज्यूस, डोसा, सॅलेड, मिल्क शेक, चॉकलेट आदी पदार्थ बनवले. कोरोनामुळे या स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. हयानचे वडील चेन्नईत रेस्टॉरंट चालवतात. आठवडय़ाभरापासून मी घडय़ाळ लावून पदार्थ बनवण्याचा सराव करत होतो. याव्यतिरिक्त विशेष अशी तयारी केली नव्हती, असे त्याने सांगितले.