
एलूर येथे राहणाऱ्या दाक्षिणात्य कुटुंबाने बांधलेले घर अनेकांचे आकर्षण ठरले आहे. पुरामध्येही तग धरू शकेल आणि एसीची गरजही भासणार नाही, अशी मजबूत वास्तू पुरुषन यांनी बांधली आहे.
2018 साली एलूरला भीषण पुराने तडाखा दिला. अनेक घरे पाण्याखाली गेली. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पुरुषन यांच्याही घराचे नुकसान झाले. त्यांचे सामान वाहून गेले. या घटनेनंतर त्यांनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्याबरोबरच पुराचा धोका नसलेले शाश्वत घर बांधण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी जुन्या काँक्रीटच्या घरावर पुर्नप्रक्रिया करून अनोखे निवासस्थान बनवले. पुरुषन हे स्वतः बांधकाम व्यावसायाशी संबंधित होते. त्यामुळे पर्यावरणपूरक बांधकामाकडे त्यांचा ओढा आहे.
– घरातील काँक्रीटचा ढिगारा, विटा, बाथरूमच्या फरशा आणि कपाटे यांचा पहिल्या मजल्यापर्यंत पुनर्वापर करण्यात आला. पहिल्या मजल्यावर व्हिजिटिंग रूम, डायनिंग स्पेस, मास्टर बेडरूम आणि ओपन किचन बांधण्यात आले आहे. यामुळे पुरापासून संरक्षण होते.
रुम फॉर द रिव्हर
2018 मध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा घरात 8.5 फुटांपर्यंत पाणी होते. 3000 चौरस फूट घराचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची ‘रूम फॉर द रिव्हर’ अशी रचना. पुराच्या वेळी इमारतींचे संरक्षण करण्यासाठी हे डच-प्रेरित असे डिझाइन आहे. यात अंतर्गत तळ मजल्यावर उंच बनवलेल्या खांबांवर घर बांधले जाते आणि तळमजला रिकामा ठेवला जातो. पुरूषन यांनी घराचा पहिला मजला 10 फूट उंच करण्याचा निर्णय घेतला. आता पूर आला तरी खालून पाणी सहज वाहून जाऊ शकते. या संकल्पनेला ‘रूम फॉर द रिव्हर’ असे म्हणतात.


























































