लिंगबदलाच्या शस्त्रक्रीयेदरम्यान झाल्या चुका, केरळमधील ट्रान्सजेंडर उमेदवाराची आत्महत्या

केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार म्हणून समोर आलेली अनन्या कुमारी अॅलेक्स हिने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रीयेत काही चुका झाल्याचा आरोप अनन्याने काही दिवसांपूर्वी केला होता. या शस्त्रक्रीयेनंतर अनन्याला अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ती निराश झाली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

28 वर्षीय अॅलेक्स ही केरळमधील ट्रान्सजेंडर समाजातील पहिली रेडियोजॉकी होती. अनन्याने 2020 मध्ये कोच्चीमधील एका खाजगी रुग्णालयात लिंग बदलाची शस्त्रक्रीया केली होती. मात्र या शस्त्रक्रीयेनंतर अनन्याला शारीरिक तक्रारी जाणवू लागल्या. ती बराच वेळ एका जागी उभी राहू शकत नव्हती. शारीरिक कामं करतानाही तिला त्रास व्हायचा. त्यामुळे ती वैतागली होती. तिने काही दिवासांपूर्वी तिच्या शस्त्रक्रीयेत काही चुका झाल्याचे म्हटले होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनन्या कुमारी डेमोक्रेटीक सोशल जस्टीस पार्टीकडून विधानसभा निवडणूक लढवणार होती. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील वेंगारा निर्वाचन मतदारसंघातून तिने ही निवडणूक लढवायचे ठरवले होते. मात्र नंतर तिने निवडणूकीतून माघार घेतली होती.

पक्षावर केलेले गंभीर आरोप

अनन्याने तिचा पक्ष डेमोक्रेटीक सोशल जस्टिस पार्टीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. पक्षातील नेत्यांनी माझा मानसिक छळ केला. ते मला जनतेसमोर ट्रान्सजेंडर म्हणून नाही तर वेश्या म्हणून जनतेसमोर आणलं. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी ट्रान्सजेंडर लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रचारात मला माझं मत मांडू दिलं जात नाहीए. मला सतत प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत वाईट बोलण्यासाठी भाग पाडलं जात आहे. एलडीएफवर टीका करायला सांगितली जात आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जिला स्वत:चे विचार आहेत. मी त्यांचं ऐकत नव्हते त्यामुळे ते मला सतत धमक्या द्यायचे. काही वेळा तर वाद झाल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली आहे, असा आरोप अनन्या हिने केलेला.

आपली प्रतिक्रिया द्या