
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आलेल्या 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. अशातच मृत श्री सदस्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला असून यात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत श्री सदस्य 6 ते 7 तासांपासून उपाशी असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड झाले आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्यभरातून लाखो श्री सदस्य उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र उन्हाचा पारा 40 डिग्रीच्या वर गेल्याने श्री सदस्यांना उष्माघाताचा तडाखा बसला.
सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला लाखो श्री सदस्यांनी गर्दी केली होती. हा कार्यक्रम सुरू असतानाच 650हून अधिक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यातील काहींवर कार्यक्रमस्थळी असलेल्या वैद्यकीय पथकाने उपचार केले, तर 60 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 10 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
उष्माघाताने मृत्यू झालेल्या 14 श्री सदस्यांपैकी 12 जणांचे मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे सोमवारी पहाटे त्यांचे पोस्टमार्टम करण्यात आले. हे 12 जण 6 ते 7 तासांपासून उपाशी होते आणि बराच वेळ त्यांनी पाणीही प्यायले नव्हते असे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. तर अन्य दोघांच्या रिपोर्टमधून त्यांनी काही खाल्ल्याचे किंवा पाणी प्यायल्याचे स्पष्ट झालेले नाही. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.
खोके सरकार नक्की काय लपवतंय…खारघरमधील मृत्यू चेंगराचेंगरीमुळे
मृत श्री सदस्यांची खाण्यापिण्याची अबाळ झाली. त्यात त्यांचा सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क आला. पोटात अन्न आणि शरिरात पाणीही नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाण्याचा जास्त उपयोग झाला नसता, मात्र त्यांना सावलीची अधिक गरज होती. त्यात काही जण आधीपासूनच व्याधीग्रस्त होते. भूक आणि उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
View this post on Instagram
























































