खय्याम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

324

‘उमराव जान’, ‘रजिया सुल्तान’, ‘कभी कभी’, ‘नुरी’ अशा वेगळ्या प्रकारच्या संगीतप्रधान चित्रपटांना संगीत देणाऱया संगीतकार खय्याम यांच्यावर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जुहू येथील सुयश हॉस्पिटलमध्ये खय्याम यांनी सोमवारी रात्री 9.30 वाजता वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. काही दिवसांपूर्वीच वयपरत्वे होणाऱया त्रासामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, असे खय्यामजींच्या ट्रस्टचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी सांगितले.

खय्याम यांच्यावर अंधेरीतील स्मशानभूमीत मुस्लिम रीतिरिवाजानुसार आणि शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी 4 वाजता जुहू येथील त्यांच्या निवासस्थानाहून खय्याम यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी बॉलीवूडमधील अनेकजण त्यात सामील झाले. यात सोनू निगम, अलका याज्ञिक, गुलजार, विशाल भारद्वाज, अशोक पंडीत, तबस्सूम, रजा मुराद आणि अली खान यांचा समावेश होता.

बॉलीवूडला दुःख
सोमवारी रात्री खय्याम यांच्या निधनाचे वृत्त पसरताच बॉलीवूडवर शोककळा पसरली. बिग बी ऊर्फ अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खय्याम यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करणारे ट्विट केले. खय्याम यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. ती विसरता येणे शक्य नाही. पण खय्याम हे माणूस म्हणूनही फार मोठे होते. त्यांनी नवोदितांना वेळोवेळी दिलेला हातही विसरता येणार नाही, अशा शब्दांत मोदींनी दुःख व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या