खेड येथील गोवंश हत्या प्रकरणी संशयिताला अटक, आरोपीला मुंबईतून घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील बोरज गावानजीक झालेल्या गोहत्या प्रकरणातील एका संशयितास गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने गोवंश हत्या प्रकरणाचा उलगडा होणे आता शक्य होणार आहे.

मुंबई गोवा महामार्गालगतच्या बोरज गावानजीक गोवंश हत्या झाल्याचे 17 जानेवारी 2022 रोजी निदर्शनास आले होते. शेतावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थांच्या गोवंश हत्येचा प्रकार निदर्शनास आल्यावर ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची लाट उसळली होती.

ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. या दरम्यान पोलिसांना घटनास्थळी जनावरांचे अवशेष मिळून आले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या अवशेषांची तपासणी केली असता ते अवशेष गोवंशीय जनावराचे असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय घटनास्थळी पोलिसांना पशुगणनेदरम्यान जनावरांच्या कानात अडकवलेला टॅग सापडला होता. या महत्वाच्या पुराव्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली होती.

घटनास्थळी पोलिसाना जो टॅग सापडला होता त्या टॅगच्या अनुषंगाने तपास सुरु केला असता तो टॅग लोटे येथे असेलेल्या भगवान कोकरे यांच्या गोशाळेतील जनावरांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी जेव्हा भगवान कोकरे यांची चौकशी केली त्यावेळी त्यांनी गोशाळेतील जनावरे उनाड असतात रात्रीच्या वेळेत सर्वच जनावरे गोठ्यात परत येतातच असे नाही त्यामुळे टॅग जरी माझ्या गोशाळेतील आहे हे जरी खरे असले तरी जनावराची रानातून चोरी झालीं असावी असे सांगतिले होते.

गोवंश हत्त्या हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या प्रकरणातील आरोपीना शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाने एक विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दरम्यान अशा प्रकारचे गुन्हे करणारा एक सराईत गुन्हेगार मुंबई येथे असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने मुंबईत सापळा रचला आणि त्या सराईत संशयितास ताब्यात घेतले.

या आरोपीला खेड येथे आणून त्याची खास पोलीस पद्धतीने चौकशी केली असता त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने बोरज येथे गोवंश हत्त्या केल्याचे कबुल केले. त्याशिवाय रायगड जिल्ह्यातही त्याचा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपीला ताब्यात घेतल्याने आता या प्रकरणातील अन्य साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येणार आहे.