खेडमधील इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ, सतीशिळा दुर्लक्षित

>> दिलीप जाधव

खेड तालुक्यातील काही ठिकाणी पराक्रमी वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे दगडी किंवा लाकडी स्तंभ म्हणजेच वीरगळ आढळून आले आहेत. मात्र या वीरगळांबाबतचा इतिहास कुणाचा माहित नसल्याने ही वीरगळ केवळ इतिहासाचे मूक साक्षीदार बनले आहेत. खेड तालुक्यात आढळून आलेल्या या मूक साक्षीदारांना बोलतं करायचं असेल या वीरगळांना इतिहास उलगडायचा असेल तर त्यांचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांचा अभ्यास करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमी वैभव सागवेकर यांनी वीरगळांचे संवर्धन आणि इतिहास उलगडण्याचा प्रयत्न सुरु केला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास खेड तालुक्यात आढळणाऱ्या वीरगळांचा इतिहास उलगडणे शक्य होणार आहे.

पराक्रमी वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दगडी किंवा लाकडी स्तंभाला वीरगळ किंवा वीरस्तंभ असे संबोधले जाते. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर असे वीरस्तंभ म्हणजेच वीरगळ आढळून येतात. लोकजीवनात या वीरगळांना गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारली गेली आहेत अशीच काही वीरगळ (वीरस्तंभ ) खेड शहरातील जिजामाता उद्यान व खेड आंबवली मार्गावरील सुकीवली नजीक आढळून आली आहेत मात्र या वीरगळांचा काहीच इतिहास नसल्याने ही वीरगळ इतिहासाचे मुक साक्षीदार बनले आहेत.

वीरगळ म्हणजे काय, आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये ‘कल्लू’ म्हणजे दगड. वीराचा दगड तो वीरकल्लू, त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ, असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात. तर मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हातदेखील कोरलेला असतो. त्या हातात बांगडय़ा दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते. वीरगळांवर शिलालेख आढळत नाही त्यामुळे त्यांना इतिहासाच्या मूक साक्षीदार मानले जातात.

आपल्या लाडक्या योद्धय़ाचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. पण या वीरगळांबाबतचा इतिहास माहित नसल्याने या वीरगांबाबत जनमानसात तेवढीशी माहिती नाही. ज्या गावाच्या हद्दीत अशे वीरगळ आढळून येतात त्या गावचा इतिहास उज्ज्वल आहे असे मानले जाते. या गावात वीर योद्धे होऊन गेले असे या वीरगळांवरून अंदाज बांधता येतो मात्र याबाबत कुठेच काही लिहिलेले नसल्याने वीरयोद्धा आणि त्या गावचा इतिहास काय हे समजून येत नाही. ज्या गावात किंवा गावच्या परिसरात वीरगळ शिल्प आढळून येते त्या गावातील योद्धे युद्धामध्ये प्राणपणाने लढले व अजरामर झाले इतकेच ध्वनित होते. वीर योद्धयांचे स्मरण म्हणून जी वीरगळ आढळून येतात ती फारशी कलात्मक असतातच असे नाही पण त्या निर्जीव दगडाला स्वत:चा जिताजागता इतिहास आहे हे नाकारता येत नाही. हजारो वर्षांपूर्वीचे आढळणारे वीरगळ म्हणजे इतिहासाचे साक्षीदार आहेत.

खेड शहरातील जिजामाता उद्यान आणि खेड आंबवली रोडवरील सुकीवली गावच्या हद्दीत काही वीरगळ आणि सतीशिळा आढळून आली आहेत. गेली अनेक वर्षे ही वीरगळ दुर्लक्षित असल्याने त्या वीरगळांचा कुणाला फारसा इतिहास माहित असावा असे वाटत नाही. गेली अनेक वर्ष ऊन पावसाचा सामना करत हा ऐत्यासिक ठेवा आपले अस्तित्व टिकवून आहेत. गेले अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या वीरगळांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात व्हावा यासाठी या वीरगळांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. खेड येथील इतिहास प्रेमीं आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी ही स्मृतीस्थळे संवर्धन करण्याबाबत पुढाकार घेतला असल्याचे म्हटले आहे.