खेड – कशेडी घाटात लाद्या वाहून नेणारा टेम्पो उलटला

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात एका अवघड वळणावर मालवाह टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकजण ठार तर दोघेजण जखमी झाले. अपघातग्रस्त टेम्पो पनवेल येथून लाद्या घेऊन गुहागर येथे निघाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील चालक सुधाकर भागमोरे हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये लाद्या भरून पनवेल येथून गुहागर येथे निघाला होता. टेम्पो कशेडी घाट उतरत असताना कशेडी आंबा येथील अवघड वळणार चालक भागमोरे याचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

या अपघातात टेम्पोच्या हौदात बसलेला कामगार बन्सीलाल कुमावत याच्या अंगावर लाद्या पडल्याने ते जागीच ठार झाले, तर मुकेश कुमरा व राजेश कौंडर हे दोन कामगार जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड पोलिसांनी टेम्पोचालक सुधाकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कशेडी घाटात पोलादपुर हद्दीत घडलेल्या आणखी एका कार अपघातात खेड तालुक्यातील तिसंगी येथील तिघेजण जखमी झाले. या अपघातात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे 10 फुट खोल दरीत कोसळली होती.

कशेडी टॅपचे एएसआय बोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शंकर भोसले हे मुब्रा येथून अल्टो कार क्रमांक एमएच 04-टी-1176 ने खेड येथे यायला निघाले होते. त्याच्या सोबत त्यांचे वडील शंकर भोसले, आई सायली शंकर भोसले हे दोघजण होती. त्यांची कार पोलादपुर हद्दीतील कशेडी घाट चढत असताना चालक संजय भोसले यांचा कारवरील ताबा अचानक सुटला आणि ती कार डाव्या बाजूला दहा फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तिघांचेही केवळ दैव बलवत्तर म्हणून तिघेही किरकोळ जखमी होण्यावर बचावले.

आपली प्रतिक्रिया द्या