खो-खोपटू अनिकेतची नोकरीसाठी धडपड

आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा मान संपादन करणारा… राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा… मात्र तरीही पाय जमीनीवरच असणारा… ही स्टोरी वांद्रे येथील छोट्याशा वस्तीत भाड्याने राहणार्‍या मराठमोळ्या अनिकेत पोटे याची. खो-खोमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही २३ वर्षीय अनिकेत पोटे नोकरीपासून दूरच आहे. घर काम करणारी आई, बेस्टमध्ये ड्रायव्हर असलेले वडील व तुटपुंज्या पगाराच्या नोकरीवर असलेले दोन भाऊ… अशी अवस्था अनिकेत पोटेच्या कुटुंबाची. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने त्याच्याशी संपर्क साधला. त्याने मनातील भावना व्यक्त करतानाच नोकरीसाठी आटापिटा करीत असल्याचेही बोलून दाखवले.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच
मी आईवडील व दोन भावांसह वांद्रे येथे भाड्याच्या घरात राहतो. आई घरकाम करते. वडील बेस्टमध्ये ड्रायव्हरचे काम करतात. एक भाऊ ड्रायव्हर आणि एक भाऊ ऑफिस बॉय म्हणून नोकरी करतोय. या लॉकडाऊनमध्ये आर्थिक चणचण प्रचंड जाणवली, असे अनिकेत पोटे यावेळी म्हणाला.

एक लाखाची एफडी मोडली
वडील कोरोनाच्या काळातही नोकरी करीत होते. त्यामुळे याच दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. कालिना येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अखेर काही दिवसांनंतर ते बरे होऊन परत आले. पण याच दरम्यान त्यांना आणखी एका आजाराने ग्रासले. त्यामुळे मला एक लाखाची एफडीही मोडावी लागली, असे सांगणार्‍या अनिकेत पोटे याचे डोळे पाणावले.

आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी
मला पाच सीनियर राष्ट्रीय स्पर्धांसह चार फेडरेशन कपमध्येही खेळता आले. तसेच १४ वर्षांखालील गटातील स्पर्धेत दोन वेळा, १७ वर्षांखालील गटातील स्पर्धेत दोन वेळा आणि १८ वर्षांखालील गटामध्ये तीन वेळा खेळण्याची संधी मला मिळालीय. २०१६ साली इंदोर येथे झालेल्या तिसर्‍या आशियाई स्पर्धेत माझी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या कॅम्पमध्येही खेळलो. तसेच लंडनमध्ये हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामधील दोन सामन्यांच्या खो-खो मालिकेतही देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे, असे अनिकेत पोटे आवर्जून सांगतो.

… तर दोन्ही ठिकाणी योगदान देईन
महात्मा गांधी शाळेत मी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर रिझवी महाविद्यालयामधून मी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहे. सध्या मी अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. आता माझ्या कुुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची गरज आहे. लवकरात लवकर नोकरी मिळाल्यास ती इमानेइतबारे करीन. तसेच महात्मा गांधी क्लबसाठीही माझे योगदान देईन, असे अनिकेत पोटे पुढे सांगतो. बॉडी कॉण्टॅक्ट खेळ असल्यामुळे कोरोनाचा फटका यालाही बसू शकतो का, असा प्रश्न मनामध्ये येतो. पण सराव सुरू ठेवा. कोरोना नियंत्रणात आल्यावर किंवा लस आल्यानंतर या खेळाच्या स्पर्धांनाही सुरूवात होऊ शकते असे संघटनेकडून सांगण्यात आल्याचेही अनिकेत पोटेने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या