
सामना प्रतिनिधी । अहमदनगर
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 32व्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचा थरार उद्या (शुक्रवार)पासून रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल 900 खेळाडू सहभागी झाले आहेत. नामदार राम शिंदे चषक या नावाने ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती किक बॉक्सिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष खैरनार यांनी दिली.
स्पर्धेचे उदघाटन शनिवारी (दि.18) सायंकाळी 4 वाजता प्रा. भानुदास बेरड यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी तब्बल 32 जिल्ह्यातून खेळाडू येणार आहे. कॅडेट, ज्युनिअर आणि सिनिअर अशी तीन गटांत ही स्पर्धा होईल. 300 मुली व 600 मुलांचा या खेळाडूंमध्ये समावेश आहे. या स्पर्धेसाठी 200 प्रशिक्षक व पंचांची नेमणूक केली आहे. नगर जिल्ह्याला तब्बल सातव्यांदा यजमानपदाचा मान मिळाला आहे. या खेळाला ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया, शालेय क्रीडा महासंघ, महाराष्ट्र क्रीडा परिषदेची मान्यता असल्याची माहिती श्री. खैरनार यांनी दिली.
राष्ट्रीय स्पर्धा गोव्यात
स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मडगाव (गोवा) येथे ही स्पर्धा होणार असल्याचे श्री. खैरनार यांनी सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 110 खेळाडूंची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.




























































