मोकाट कुत्र्यांनी चिमुरड्याचा जीव घेतला, नागरिकांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून आज मोकाट कुत्र्यांनी अडीच वर्षाच्या एका मुलाचा बळी घेतला आहे. आयुष प्रजापती असे या मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाला कुत्र्याने चार ते पाच ठिकाणी चावा घेतला होता. चिमुरड्याला  पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर होती. याप्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये उपायुक्त यांना घेराव घातला असून तात्काळ गुन्हा दाखल करा व संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

नगर येथील एटी कॉलनी भागात राहणाऱ्या अडीच वर्षाच्या आयुषला एका मोकाट कुत्र्याने त्याचा चावा घेतला. डोक्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. आजूबाजूच्या नागरिकांना त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले. मात्र याच दरम्यान रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्ताकडे धाव घेत त्यांना घेराव घातला. मोकाट कुत्र्यांमुळे चिमुरड्याचा जीव गेला यासाठी जाब विचारला. मोकाट कुत्र्यांना आवर न घालणाऱ्या संबंधितांवर तत्काळ कारवाई करा व गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. नगरसेवक मुदस्सर शेख यांनी देखील हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

dog-bite-nagar