
खेळत असताना चुंबक गिळणाऱ्या मुलाचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मध्यप्रदेशातील इंदूरची आहे. 3 वर्षांच्या कबीर तिवारी या मुलाने 29 जुलै रोजी चुंबक गिळलं होतं. मुलाने चुंबक गिळल्याचं कळताच त्याच्या आईवडिलांनी तातडीने जवळच्या अरिहंत रुग्णालयात धाव घेतली होती. मुलाला सर्दी असल्याने ऑपरेशन करू शकत नाही असं त्यावेळी या मुलाच्या आईवडिलांना सांगण्यात आलं होतं.
औषधं देऊन मुलाला बरं करू असा डॉक्टरांनी आग्रह धरला होता. त्यांनी सांगितल्यानुसार 4 आणि 7 ऑगस्ट रोजी उपचार करण्यात आले होते. 9 ऑगस्ट रोजी अखेर डॉक्टरांनी एंडोस्कोपीच्या माधअयमातून चुंबक बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी 8.30 वाजता एंडोस्कोपीला सुरुवात झाली. ही शस्त्रक्रिया सकाळी 9.20 वाजेपर्यंत सुरू होती. ऑपरेशननंतर मुलाला बाहेर आणण्यात आलं तेव्हा सांगण्यात आलं की त्याला 45 मिनिटांनंतर शुद्ध येईल. मात्र 3-4 तास झाल्यानंतरही कबीर शुद्धीवर आला नव्हता. मुलाचं शरीर थंड पडायला लागल्याने त्याची आई घाबरली आणि तिने डॉक्टरांना याबाबत कळवलं. डॉक्टरांनी तिला आणखी थोडावेळ वाट पाहा असं सांगितलं. ज्यानंतर थोडावेळातच कबीरचा मृत्यू झाला. कबीरचं हृदय अचानक हृदय बंद पडलं, ज्यामुळे त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं असं त्याच्या पालकांनी सांगितलं आहे.
कबीरचे वडील सुनील यांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलाचा मृत्यू हा अॅनास्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. चुंबक गिळल्यानंतरही कबीर व्यवस्थित होता. सोमवारी ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वीही तो हसतखेळत होता, मग अचानक असं कसं झालं असा प्रश्न सुनील यांनी विचारला आहे. सुनील तिवारी यांनी या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कबीरचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.


























































