
पैशाच्या वादातून विमा एजंटचे अपहरण करून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अच्छेलाल यादव, मनोहर देवघरे, मनीष पंचरास अशी त्या तिघांची नावे आहेत.
तक्रारदार हे विमा एजंट आहेत. तर अच्छेलालचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी अच्छेलालची तक्रारदार याच्यासोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने अच्छेलालला विमा पॉलिसीत गुंतवणूक कर असे सांगितले होते. त्यावर विश्वास ठेऊन अच्छेलालने पैसे गुंतवले होते. पॉलिसीच्या पैशापैकी काही पैसे त्याने अच्छेलालला परत केले होते. उर्वरित पैशावरून त्याच्यात वाद सुरू होता.
चार दिवसांपूर्वी तक्रारदार हे मालाड परिसरात होते. तेव्हा अच्छेलालने त्यांना भेटायला बोलावले. त्यानंतर त्यांना त्या तिघांनी रिक्षात बसवले. मालाडच्या कुरार गावात नेऊन तेथील एका दुकानातून 2 लाख 75 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास लावले. एवढेच नव्हे तर त्यांना गोरेगाव येथील एका एटीएममध्ये नेऊन खात्यातून 1 लाख रुपये काढून घेत काही कागदपत्रांवर सह्या केल्या. जर उर्वरित 30 लाख रुपये न दिल्यास घरातून उचलून नेऊ, असे अशी धमकी दिली. रात्री एजंटने त्याची सुटका केल्यावर कांदिवली पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सोहन कदम, हेमंत गीते, उपनिरीक्षक इंद्रजित भिसे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना अच्छेलालची माहिती मिळाली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक दूध विक्रेते बनून तबेल्यात शिरले. आणि त्यांना अटक केली.






























































