
आजकाल मोठ्या माणसांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे आढळून येत आहे. याला बदलत्या जीवन शैलीसोबत आजूबाजूचं वातावरणही कारणीभूत आहे. आज विज्ञान-तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली असून मुलांच्या पाठीवरचं कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ओझं वाढतच आहे. शालेय मुलांच्या नैराश्यामागे पुस्तकांचं ओझं असल्याचं म्हटलं जातं आहे. याशिवाय मोबाईलचं वाढतं प्रमाण ताण-तणाव, नैराश्याचं कारण बनत आहे. आजकालची मुले तासंतास मोबाईलवर असतात. या मोबाईलवर पुरवण्यात येणारी माहिती मुलांचं मानसिक आजारपण वाढवण्यास कारणीभूत आहे. आपल्या आजूबाजूला पाहतो की, मुले छोटया-छोट्या गोष्टींवरून हिंसक वर्तन करता दिसून येतात. आईने किंवा बाबाने हातातील मोबाईल काढून घेतला म्हणून टोकाचं पाऊल उचलल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. तसेच आई-बाबा सहज रागावले तरी मुलांना बिलकुल सहन होत नाही. अशी सर्व परिस्थिती असताना मुलं नैराश्याच्या गर्तेत ढकलली जाऊ नयेत म्हणून पालकांनी जास्त सजग राहणं महत्त्वाचं आहे.
1) मुलांमध्ये अचानक चिडचिडेपणा वाढणं
जर तुमचं मुल प्रत्येक गोष्टीवरून भांडण करत असेल. चिडचिड करत असेल. एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मारामारी करण्यासाठी उतावीळ होत असेल, तर हे पालकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कारण मुलांचं असं वर्तन नैराश्याची स्थिती असू शकते. हे लक्षात घेऊन पालकांनी एखाद्या चांगल्या समुपदेशकाकडे मुलांना दाखवण्याची आवश्यकता आहे. याबाबत गरज पडली तर एखादया मानसशास्त्रज्ञांकडेही ट्रिटमेंट सुरू करायला हवी.
2) मुल अचानक शांत झालं का ?
बडबड करणार मुलं अचानक शांत शांत राहायला लागलं. त्याला कुणाशीही बोलायला आवडत नसेल. त्याच्याशी कुणी बोलण्याचा, गप्पा मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बोलण्यासाठी नकार देत असेल, तर अशा परिस्थितीत पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे.
3) मुल एकटेच राहात असेल तर
आपण सर्वचजण पाहतो की मुलं खूप चंचल असतात. एके ठिकाणी बसू शकत नाहीत. पण अचानक मुल शांत होऊन एकटेच राहायला लागत असेल. आई-बाबा किंवा इतर कुणाशीही बोलण्यासाठी नाखूष असेल. खोलीत स्वत:शीच बडबड करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. यावरून मुलाचं मानसिक संतुलन चांगलं नसल्याचं दिसून येते. लवकरच मुलाच्या समुपदेशनाला सुरूवात करून मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.































































