पोलार्डची ‘सिक्सर किंग’ युवराजच्या विक्रमाशी बरोबरी, सलग 6 षटकारांची आतिषबाजी

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज किरोन पोलार्ड श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत फिरकीपटू अकिला धनंजय (Akila Dananjaya) याच्या एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पोलार्ड दुसरा फलंदाज ठरला असून त्याने टीम इंडियाचा माजी खेळाडू ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

बुधवारी अँटिगाच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका असा टी-20 सामना रंगला. या लढतीत 33 वर्षीय पोलार्डने फिरकीपटू अकिला धनंजय याची चांगलीच धुलाई केली. पोलार्डने त्याला सलग सहा षटकार ठोकले. बाद त्याने या लढतीत 11 चेंडूत 38 केल्या.

युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

पोलार्डने युवराज सिंह याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज सिंह याने 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला सलग सहा चेंडूवर सहा ठोकत विक्रम केला होता. यानंतर आता 14 वर्षांनी पोलार्डने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्ज याने 2007 ला एक दिवसीय विश्वचषकामध्ये नेदरलँडचा गोलंदाज डॅन वॅन बंज याच्या एकाच षटकामध्ये सहा षटकार ठोकले होते.

अकिलाची हॅटट्रीक

दरम्यान, पोलार्डचे वादळ घोंगावण्यापूर्वी अकिला धनंजय याने याच लढतीमध्ये हॅटट्रीक घेतली होती. मात्र त्याच्या पुढच्याच षटकामध्ये अकिलाच्या गोलंदाजीच्या पोलार्डने पार चिंधड्या उडवल्या. त्यामुळे त्याची ही कामगिरी झाकोळली गेली.

इंडीजचा विजय

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांमध्ये 131 धावा करत वेस्ट इंडीजला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले. लेवीस आणि सिमन्सने 50 धावांची सलामी दिली. मात्र चौथ्या षटकामध्ये अकिला धनंजय याने लेवीस, गेल आणि पूरन यांना एकामागोमाग एक बाद करत हॅटट्रीक घेतली आणि लंकेने सामन्यात पुनरागमन केले. मात्र यानंतर पोलार्डने तुफानी फलंदाजी करत संघाला 14 व्या षटकात 4 विकेट्सने विजय मिळवून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या