…म्हणून पंतप्रधान किल्लारीत आले नाहीत, कृतज्ञता सोहळ्यात पवारांनी जागवल्या भूकंपाच्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किल्लारीचा भूकंप नैसर्गिक अवकृपा होती. सगळीकडे अफरातफर उडाली होती. दगडमातीचा खच आणि त्याखाली संपलेले जीवन! केवळ आक्रोश कानावर पडत होता. परंतु आम्ही अतिशय धैर्याने या संकटाचा सामना केला. भूकंपकाळात सरकार, प्रशासनाने अविरत काम करून एक आदर्श जगासमोर ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान येणार होते. परंतु मी त्यांना येऊ नका अशी विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली, अशी आठवणही पवारांनी सांगितली.

30 सप्टेंबर 1993 रोजी महप्रलंयकारी भूपंपाने महाराष्ट्र  हादरला. त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांत पवार किल्लारीत हजर होते. पवारांपाठोपाठ सगळे सरकारच लातूरात आले. मदत आणि पुनर्वसनाच्या कामाचा आदर्श वस्तूपाठ पवारांनी घालून दिला. जगभर त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. या घटनेला शनिवारी 30 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कृतज्ञता सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना शरद पवार यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यातील गणेश विसर्जनाचा आढावा घेतला. परभणीत थोडा गोंधळ झाला होता. पहाटे साडेतीन वाजता थोडा डोळा लागताच राज्यात भूकंप झाल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर लातूर, धाराशिव येथून पह्न खणखणायला लागले. तेथून मिळणाऱ्या माहितीवरून भूकंप प्रलंयकारी असल्याचा अंदाज आला आणि मी लगेच लातूरला जाण्याचा निर्णय घेतला. विलासराव देशमुख आणि पद्मसिंह पाटील यांना तात्काळ निरोप दिला. सकाळी सहा वाजता मी किल्लारीत पोहोचलो.

यावेळी व्यासपीठावर दिलीपराव देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, संजय बनसोडे, ओमराजे निंबाळकर, गोपाळराव पाटील, राजेश टोपे आदी उपस्थित होते.

आपत्ती निवारण यंत्रणाच नव्हती

किल्लारीतील भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान येणार होते. परंतु मी त्यांना येऊ नका अशी विनंती केली. कारण पंतप्रधान आले तर सगळे प्रशासन त्यांच्या दिमतीला जाईल आणि मदत, पुनर्वसन कामावर त्याचा परिणाम होईल असे मी त्यांना सांगितले. माझी विनंती त्यांनी मान्य केली. किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळी आपल्याकडे आपत्ती निवारण यंत्रणा नव्हती. हा विषय मी प्रामुख्याने मांडला. त्यानंतर ही जबाबदारीच सोनिया गांधी यांनी माझ्याकडे सोपवली. त्यावर दोन वर्षे काम करण्यात आले आणि आता आपल्याकडे सक्षम आपत्ती निवारण यंत्रणा तयार आहे. पण याचा उगम किल्लारीत झाला असे पवार म्हणाले.

जिल्हाधिकारी बैलगाडीत झोपले

किल्लारीतले चित्र अतिशय विदारक होते. कारण भूपंपाचा पेंद्रबिंदूच येथे होता. चिरेबंदी वाडे धाराशाही झाले होते. सगळीकडे नुसता दगडविटांचा खच, मातीचे ढिगारे आणि त्याखाली दबलेले जीव! ज्यांना बाहेर काढता येणे शक्य होते त्यांना काढून जागेवरच उपचाराची सोय करून दिली. संकट एकटे आले नव्हते. भूकंप झाला आणि पाठोपाठ पाऊस सुरू झाला. त्यामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. पण सरकार झपाटून कामाला लागले होते. अहोरात्र काम करून सरकार, प्रशासनाने मदतकार्यात सुसुत्रता आणली. त्यावेळी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी अतिश्रमामुळे बैलगाडीतच झोपल्याचे पाहिले, असे शरद पवार म्हणाले.