
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नगरसेविका किरण दराडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. तसे केल्यास आम्ही शिंदे गटात बिनशर्त प्रवेश करू असे दराडे यांनी या पत्रात लिहिले आहे. दराडे यांच्या उपरोधिक पत्राची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
नगरसेविका किरण दराडे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “मुख्यमंत्री महोदय गेल्या चार दिवसात जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर व्यक्तिगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले, तुरुंगात डांबले त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत साहेब यांना बेकायदेशीर अटक केली.हा सर्व प्रकार निषेधार्ह आहे.मा. जितेंद्र आव्हाड व खासदार संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करीत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्या तीन सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तात्काळ धुमधडाक्यात प्रवेश करू.”

























































