मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘त्या’ महिलेची तक्रार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोडाफोडीचे राजकारण करून राज्याची सत्ता हस्तगत करणाऱ्या मिंधे सरकारची दडपशाही अद्यापही सुरूच आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला  मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना अटक होऊन 72 तास उलटत नाही तोच त्यांच्यावर पोलिसांनी आता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रिदा रशीद या महिलेने आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर लगेच पोलिसांनी गुन्हाही नोंदवला. ही महिला भाजप महिला मोर्चाची उपाध्यक्षा आहे. दरम्यान, अशा प्रकारचे खोटे व घाणेरडे आरोप आपल्यावर होत असतील तर नको ते राजकारण असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या कारवाईचा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अनेक शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून काहींच्या तडीपाऱ्या केल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही टार्गेट करण्यात आले आहे. रविवारी नव्या कळवा खाडीपुलाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उद्घाटनाचा हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गर्दीतून वाट काढत जितेंद्र आव्हाड पुढे जात होते. त्याचवेळी गर्दीत समोरून एक महिला आली. त्यावेळी  इतक्या गर्दीत तुम्ही इथे कुठे आलात, जरा साईड द्या.. असे सांगत त्यांनी रिदा रशीद यांना बाजूला केले. याप्रसंगी पोलीसही उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पुलाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे माजी नगरसेवक राजन किणे यांच्या घरी गेले. लगेच तेथे धाव घेऊन रिदा रशीद यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. या चर्चेनंतर तिने थेट मुंब्रा पोलीस ठाणे गाठले आणि आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार केली.

दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आव्हाड यांनी ठाणे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  त्यांच्या जामीनावर मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीनावर सुनावणी होईपर्यंत आव्हाड यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका, असे आदेश ठाणे न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना दिले आहेत.

घटनेचा सूत्रधार कोण याचा शोध घ्या – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. तुमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे असून  संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आपल्या पाठीशी असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सरकारने आखले असून या घटनेमागील सूत्रधार शोधून काढा. विरोधी पक्षाचा अशाप्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ती लाजीरवाणी बाब आहे. लोकशाही, घटना आणि नियम यालाच तिलांजली देण्याचे काम सध्याचे सरकार करीत असून पोलीस दबावाखाली वागत आहेत, असेही अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

खुनाचा गुन्हा चालला असता.. पण विनयभंगाचा अजिबात मान्य नाही – जितेंद्र आव्हाड

एकवेळ माझ्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला असता, तो मला चाललाही असता, पण एका महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा माझ्यावर नोंदवला. ही घटना माझ्या काळजाला लागली आहे. हा गुन्हा मला अजिबात मान्य नाही. इतक्या खालच्या पातळीवरचे  राजकारण महाराष्ट्रात केले जाऊ नये अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.  मुख्यमंत्र्यांच्या समोरच सारे काही घडले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला हे पटते काय, असा सवालच आव्हाड यांनी केला.

मर्द असाल तर कामातून उत्तर द्या – ऋता आव्हाड

खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना मला सांगायचंय, मर्द असाल तर कामातून उत्तर द्या.. नामर्दासारखं बाईला पुढे करून कोणाचीही राजकीय हत्या करू नका, असे थेट आव्हानच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.  काल जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे आणि आव्हाडांमध्ये तू तू मै मै झाले तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि व्हायचे ते झाले, असेही ऋता आव्हाड म्हणाल्या.

पोलिसांना प्यादे बनवून विरोधकांवर कारवाया – जयंत पाटील

महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांचा गैरवापर सुरू आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांचे प्यादे म्हणून वागत असतील तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर साफ घसरला आहे. व्यक्तिगत निंदा-नालस्ती केली जात आहे. विरोधक विरोध करत असतील तर त्यांच्याविरोधात पोलीस यंत्रणा उभी करून त्यांना त्रास देण्याची कारस्थाने रचली जात आहेत. आम्ही विनयभंगाचे कधीही समर्थन करणार नाही. मात्र या घटनेत तसे काहीही झालेले नाही, असे पाटील म्हणाले.

पोलीस नियमानुसार कारवाई करतील – मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याबाबत आज पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणात पोलीस नियमानुसार  कारवाई करत असून तथ्य असेल तर त्यानुसार ही कारवाई होईल.

मुंब्य्रात रास्ता रोको, जाळपोळ

आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संपूर्ण मुंब्य्रात संतापाची लाट उसळली. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तसेच मुंब्रा बायपासवर टायर जाळले. या आंदोलनात असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीविरोधात घोषणा दिल्या.

समर्थन करणाऱ्यांना अटक करा – बावनकुळे

जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचे जो कोणी समर्थन करत असेल त्याला अटक करा, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन करावे, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

खोटे गुन्हे दाखल व्हायला हे गुंडाराज नाही – अमृता फडणवीस

आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल व्हायला हे महाविकास आघाडी सरकार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. ठाण्यातील चित्रपटगृहात झालेल्या मारहाण प्रकरणावरही त्या बोलल्या. महाराष्ट्रात आता गुंडाराज राहिलेले नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. तुम्ही अशी गुंडागर्दी नाही करू शकत. हे महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती नाही, असे त्या म्हणाल्या.