ठाण्यात बेसावध शिवसैनिकांवर मिंधे गटाच्या जमावाचा हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील किसननगर भागात आज रात्री मिंधे गटाच्या गुंडांनी बेसावध शिवसैनिकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात दोन शिवसैनिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र तक्रार घेण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारीही जागेवर नसल्याने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर दडपशाही सुरू आहे काय, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केला.

ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, दौरे धडाक्यात सुरू असल्याने मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातच आज किसननगर येथील भटवाडी परिसरात नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवत्ते चिंतामणी कारखानीस यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

बैठक सुरू असतानाच  मिंधे गटाच्या 150 गुंडांनी बेसावध शिवसैनिकांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी उपशहरप्रमुख दीपक साळवी आणि हेमंत नार्वेकर यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर खासदार राजन विचारे, मधुकर देशमुख, केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत मिंधे गटाच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मिंधे गटाच्या जमावानेही कांगावा करत शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

हा हल्ला एकनाथ शिंदेंच्या चिथावणीमुळेच

एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या किसन नगरात शिवसैनिकांची बैठक होत असल्याचे कळताच त्यांच्या इशाऱ्यावरूनच मिंधे गटाच्या जमावाने बेसावध शिवसैनिकांवर हा हल्ला केला, असा आरोप शिवसैनिकांनी केला. शिंदे यांनी कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसैनिक ठामपणे ‘मातोश्री’च्या पाठीशी उभे राहून ठाण्यात शिवसेनेचा भगवा फडकवतील असेही शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले.