किर्लोस्कर उद्योग समूहाचा वाद सेबीकडे, तीन बंधूंमधील व्यावसायिक संघर्ष चव्हाट्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 132 वर्षांपासून कार्यरत असलेल्या किर्लोस्कर उद्योग समूहातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. तीन किर्लोस्कर बंधूंमधील व्यावसायिक वाद विकोपाला गेला असून, त्यांनी थेट सेबीचा दरवाजा ठोठावला आहे. 2009मध्ये तिघा भावांमध्ये तोडगा काढून वाद मिटविण्यात आले होते. मात्र, हा तोडगाच आता या तिघांनाही मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अतुल, संजय आणि राहुल या किर्लोस्कर बंधूंमध्ये दहा वर्षांपासून व्यावसायिक वाद सुरू आहेत. यात अतुल आणि राहुल हे बंधू एकत्र असून, मधले बंधू संजय यांचे या दोघांशी पटत नाही. त्यामुळे संजय किर्लोस्कर यांना किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडची (केसीएल) मालकी हक्क देण्यात आले होते, तर किर्लोस्कर इंडस्ट्रिजची सूत्रे अतुल आणि राहुल यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या परिवारातील प्रमुख असलेल्या सुमन किर्लोस्कर यांचे अतुल आणि राहुल या आपल्या दोन मुलांना समर्थन आहे. किर्लोस्कर बंधूंचे वडील चंद्रकांत किर्लोस्कर यांनी पुण्यातील प्रॉपर्टी आपल्या पत्नीच्या नावे केली होती. सुरुवातीला हा कौटुंबिक वाद चार भिंतीच्या आत मिटविण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र, तिघेही बंधू महत्त्वकांक्षी असल्याने दुर्दैवाने या वादावर तोडगा निघू शकला नाही. शेवटी हा वाद सिक्युरिटिज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या हिंदुस्थानातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्य़ा सर्वोच्च संस्थेकडे आला आहे.

15 हजार कोटींची उलाढाल

केबीएल वेबसाइटवरील माहितीवरून किर्लोस्कर ग्रुपची सध्याची उलाढाल ही 2.1 अब्ज डॉलर (जवळपास 15 हजार कोटी) इतकी आहे. यात 2017च्या तुलनेत 3.5 अब्ज डॉलरची घरसण झाली आहे. या ग्रुपकडे अनेक कंपन्या आहेत. यातील पाच कंपन्या लिस्टेड असून, त्यांची 2020 पर्यंतची उलाढाल ही 11 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

सेबीच्या निकालाकडे नजरा

किर्लोस्कर बंधूंच्या नजरा आता सेबीच्या निकालाकडे आहेत. निकाल ज्याच्या विरोधात जाईल ती व्यक्ती सहाजिकच पुन्हा अपील करणार आणि हा वाद पुढेही सुरूच राहणार आहे. पुण्यातील संपत्तीबरोबरच ग्रुपचे ट्रेडमार्क व कॉपी राइट हक्क यावरून वाद सुरूच आहे. अतुल आणि राहुल यांनी केबीएलच्या व्यवस्थापनातील गैरकारभाराबाबत बंधू संजय यांच्यावर आधीच आरोप केलेले आहेत. त्यामुळे या किर्लोस्कर बंधूंमधील वाद लवकर संपुष्टात येईल, अशी चिन्हे दिसत नाही.