
सामना प्रतिनिधी । जामखेड
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त भव्य किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात तालुक्यातील युपीएससी, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) निवड झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री राम शिंदे तसेच युवा उद्योजक रमेश आजबे करणार आहेत. मंगळवार दि. १२ रोजी समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे, दि. १३ रोजी विनोदाचार्य बबन महाराज बहिरवाल धामणगाव, दि. १४ रोजी बाळू महाराज गिरगावकर परभणी, दि. १५ रोजी रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर बुलढाणा, दि. १६ रोजी भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, दि. १७ रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम, दि. १८ रोजी डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, तसेच दि. १९ रोजी कैलास महाराज भोरे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रतिभा भुते, सतिश इंगळे, नम्रता राऊत, धवल गोलेकर, दिंगाबर ढाळे, रमेश नेटके, घनश्याम तांबे, अंगद नेमाने, इरफान सय्यद, अमोल शेळके, युवराज चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, प्रियंका कारंडे, महादेव कारंडे व मच्छिंद्र कोल्हे या प्रशासनात निवड झालेल्या अधिकार्यांचा तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो येथे निवड झालेल्या प्राजक्ता घोगरे, शामल राऊत व निकिता पवार यांनाही तालुक्याच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
संपूर्ण कार्यक्रम शिवछत्रपती नगर मराठी शाळेमागे होणार आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक व वादक उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्ती शक्ती महोत्सव समितीचे संयोजक दिपक महाराज गायकवाड यांनी सांगितले.

































































