
कोणत्याही कारणाने वाद उकरून काढण्याची जुनी खोड असलेल्या बोलघेवडय़ा भाजपला आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत न पडलेले खड्डे आणि वाहतूककोंडी दिसू लागली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यापुढे जाऊन त्याचा संबंध घटस्फोटाशी जोडण्याचा बालीशपणा केला. त्यावर त्यांच्यासारख्या टॅलेंटेड व्यक्ती दिल्लीत काही बोलल्या तर त्यामुळे महाराष्ट्राला काही तरी चांगले मिळेल, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडते तेव्हा मला किती वाहतूककोंडी होते हे दिसते. खड्डय़ांमुळे किती त्रास होतो हे दिसते. मुंबईत वाहतूककोंडीमुळे घटस्फोट होण्याचे प्रमाण तीन टक्के आहे; कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
आतापर्यंत त्यांनी सगळी विधाने भयानकच केली आहेत. त्यातले हे फारच भयानक विधान आहे. तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर महाराष्ट्राला काही चांगले मिळेल,असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

































































