
अश्लील व्हिडीओमुळे नाचक्की झालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘अब्रू’ वाचवण्याचा आटापिटा सुरू ठेवला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकशाही वृत्तवाहिनी आणि यूटय़ूबर अनिल थत्ते यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर बुधवारी न्यायालयाने प्रतिवादींचे उत्तर मागवत सुनावणी तीन आठवडय़ांसाठी लांबणीवर टाकली.
अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठली. राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले. यादरम्यान अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात सोमय्या यांच्या ‘त्या’ व्हिडीओचा मुद्दा उचलून धरला. सोमय्यांनी अनेक महिलांशी संपर्क केल्याचा दावा करीत दानवेंनी सभागृहात पेनड्राईव्ह सादर केला आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोमय्या यांनी आपली बदनामी झाल्याचा कांगावा करीत दानवे यांच्यासह लोकशाही वृत्तवाहिनी, अनिल थत्ते यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा केला. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी अंबादास दानवे यांच्यातर्फे ऍड. रूपेश गीते, ऍड. शुभम काहिटे आणि ऍड. दर्शन साहुजी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर सादर करण्यास वेळ देत सुनावणी तीन आठवडय़ांसाठी तहकूब केली.
























































