बांगलादेशी क्रिकेटर मुस्तफिजूरला आयपीएलमधून वगळले! बीसीसीआयच्या सूचनेनंतर शाहरुख खानच्या संघाचा निर्णय

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला शनिवारी संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर मुस्तफिजूरला आयपीएलमध्ये खेळवू नये, अशी देशभरातून मागणी होत होती. त्यानंतर बीसीसीआयने शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआर संघाला मुस्तफिजूरला रिलीज करण्याचे निर्देश दिले, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

केकेआरने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, ‘बीसीसीआय’च्या निर्देशांनंतर सर्व आवश्यक प्रक्रिया आणि सल्लामसलत पूर्ण करून मुस्तफिजूर रहमानला संघातून मुक्त करण्यात आले आहे. आयपीएलच्या नियमांनुसार बीसीसीआयने केकेआरला रिप्लेसमेंट खेळाडू घेण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भातील पुढील माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल.’

बांगलादेशमध्ये मागील १४ दिवसांत चार हिंदूंची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिंदुस्थानात सध्या बांगलादेशविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. त्या पाश्र्वभूमीवर आयपीएल स्पर्धेवर काही विघ्न नको म्हणून या स्पर्धेतील एकमेव बांगलादेशी क्रिकेटपटू असलेल्या मुस्तफिजूर रहमानला वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या अगामी हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार असून, अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे.

याआधी ‘बीसीसीआय’चे सचिव देवजीत सैकिया यांनी सकाळी सांगितले होते की, ‘अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांचा विचार करता, बोर्डाने केकेआर संघाला मुस्तफिजूरला रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत. फ्रँचायझीने रिप्लेसमेंट खेळाडूची मागणी केल्यास त्याला परवानगी दिली जाईल.’