संसदेत नमाजी टोपी घालणे धार्मिक नाही का? अभिनेत्रीचा ओवेसींना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिराच्या भूमी पूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अभिनेत्री कोयना मित्राने जबरदस्त टीका केली आहे. ‘संसदेत नमाजी टोपी घालून जाणे हे धार्मिक नाही का?’, असा सवाल कोयनाने ट्विटरवरून ओवेसींना केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांवर राम मंदिराच्या भूमीपूजनाला उपस्थित राहण्यावरून ट्विटरवरून टीका केली होती. ‘पंतप्रधान जर भूमी पूजनात सहभागी झाले तर त्यांच्या संविधानिकपदाच्या शपथेचे उल्लंघन होणार. धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानाचा पाया आहे. आपण हे विसरून चालणार नाही की 400 वर्ष बाबरी मशिद अयोध्येत उभी होती व 1992 मध्ये ती उद्ध्वस्त करण्यात आली’, असे ट्विट ओवेसींनी केले होते. त्या ट्विटवरून कोयनाने ओवेसींवर टीका केली आहे. ‘संसदेत नमाजी टोपी घालून जाणे हे जातीयवादी नाही पण भूमी पूजनासाठी जाणे धार्मिक झाले? 40हजार मंदिर लुटली व उध्वस्त केली. पुढच्या पिढीला याविषयी माहिती असली पाहिजे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्याचे इफ्तार पार्टीत सहभागी होणे धार्मिक नाही पण भूमीपूजनाला जाणे धार्मिक होते. ढोंगीपणा आहे हा’, अशी टीका कोयनाने केली आहे.

अयोध्येतील भूमिपूजनावर सावट; राममंदिराच्या पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोना

अयोध्येत 5 ऑगस्टला असलेल्या राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर कोरोनाचे सावट पसरले आहे. रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य असणारे पुजारी प्रदीप दास यांच्यासह तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 16 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

अर्धे अयोध्या शहर कोरोनाग्रस्त

एकीकडे राममंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ाची जय्यत तयारी प्रशासन करत असतानाच गुरुवारी मंदिराच्या पुजाऱ्यासह सुरक्षेसाठी तैनात 16 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच प्रशासन हादरले. उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर असून अयोध्या जिल्हा आणि शहरही त्यातून सुटलेले नाही. अयोध्येत बुधवारी 66 रुग्ण सापडले. पोलीस लाइन, अवधपुरी, कौशलपुरी, हनुमानगढी येथे नवे रुग्ण सापडले. अयोध्येतील कोरोनाबाधितांची संख्या 1041 झाली आहे.

3 ऑगस्टपासून भूमिपूजन कार्यक्रम

राममंदिर भूमिपू जन आणि शीलान्यासाचा कार्यक्रम 3 ऑगस्टपासूनच सुरू होणार आहे. 3 तारखेला अनुष्ठान आणि पूजन कार्यक्रम होईल. त्यानंतर गणेश पूजन होऊन उत्सव सुरू होईल. 4 ऑगस्टला रामअर्चा आणि 5 तारखेला सकाळी 8 वाजता काशी येथील 11 ब्राम्हणांच्या हस्ते गर्भगृहात पूजन होईल, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी दिली.