
राज्यात मागील वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात क्यार व महाचक्रीवादळाने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. या वादळात नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना विशेष दराने मदत देण्यासाठी 8 कोटी 88 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
क्यार व महा चक्रीवादळामुळे राज्यातल्या 34 जिल्ह्यातल्या 349 तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कोकण विभागीय आयुक्तांनी अतिरिक्त निधीची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 कोटी 88 लाख 54 हजार रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास राज्याच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे.
त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी रुपये, पालघरला सुमारे 3 कोटी 79 लाख, रायगडला 2 कोटी 98 लाख व सिंधुदुर्ग जिह्याला 1 कोटी 11 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. त्यातून शेतीपिकांसाठी हेक्टरी 8 हजार रुपये तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. मात्र या मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची आर्थिक वसुली करू नये असे आदेश सरकारने सर्व बँकांना दिले आहेत.































































