
अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे. मालवण किनारपट्टीवर आज (2 जून) सकाळ पासून वाऱ्यांनी जोर धरला आहे. समुद्रही काहीसा खवळला असून जोरदार लाटा उसळण्यास सुरवात झाली आहे. सकाळ पासून पावसाचा जोरही कायम आहे. दरम्यान, वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून नुकसान झाल्याची नोंदही आहे.
प्रशासनाने किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. आवश्यकता भासल्यास खबरदारी म्हणून काही किनारपट्टी भागातील नागरिकांच्या स्थलांतराची तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.
एनडीआरएफ’ची टीम दाखल
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’ची टीम दाखल झाली असून मालवण तारकर्ली येथे ही टीम तैनात आहे.































































