
काही अपवाद वगळता, जिह्यात यंदाही पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जनास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिह्यात तब्बल सव्वाचार लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले, तर 600 टनांपेक्षा अधिक निर्माल्य संकलन झाले. शहरात कोल्हापूर महापालिकेच्या वतीने तब्बल 60 हजारांहून अधिक ‘श्रीं’च्या मूर्तींचे संकलन झाले, तर दिडशे टनांहून अधिक निर्माल्य संकलन झाले.
कोल्हापूर शहरात घरगुती गौरी-गणपती विसर्जनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 60 हजार 341 मूर्ती इराणी खणीत पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये व इराणी खणीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या. पंचगंगा नदी, तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी 160 पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांची पर्यायी व्यवस्था केली होती. याशिवाय सार्वजनिक मंडळे, तालीम व संस्थांनीही कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते. घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने सर्व यंत्रणा सकाळी 7पासून दुसऱया दिवशी पहाटे 4.30पर्यंत काम करीत होती. यामध्ये महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पवडी, आरोग्य व विविध विभागांचे सुमारे तीन हजार कर्मचारी, गणेशमूर्ती संकलनासाठी 205 टेम्पो, 480 हमाल आदी यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
आरोग्य विभागाच्या वतीने 13 आरोग्य निरीक्षकांचे पथक व ‘अवनी’ संस्थेच्या 150 महिलांनी निर्माल्य संकलित केले. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने 950 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली होती. संकलन झालेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पिटल येथे पाठविले. पहाटेपर्यंत 3 ट्रक्टरद्वारे निर्माल्य गोळा करण्यात आले.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नागरिकांना गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक, गर्दी टाळून महापालिकेने पर्यायी व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडांत विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. यानुसार गांधी मैदान-12 हजार 337, छत्रपती शिवाजी मार्केटअंतर्गत नऊ हजार 778, राजारामपुरी सात हजार 661 आणि ताराराणी विभागीय कार्यालयाअंतर्गत आठ हजार 490 अशा एकूण 38 हजार 266 गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात केले. तसेच शहर व ग्रामीण भागांतून आलेल्या 22 हजार 75 मूर्ती नागरिकांनी थेट इराणी खण येथे विसर्जित केल्या. याशिवाय नागरिकांनी गणेशमूर्ती घरीच बादलीमध्ये विसर्जित करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला. इराणी येथे विभागीय कार्यालय व नागरिकांकडून अर्पण केलेल्या मूर्ती महापालिकेने बसविलेल्या स्वयंचलित यंत्राद्वारे खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. स्वयंचलित यंत्राद्वारे 11 हजार 567 घरगुती गौरी-गणपती विसर्जन करण्यात आले.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णात पाटील, संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर व जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, मुख्य अग्निशनम अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी आदी अधिकारी व कर्मचाऱयांनी नियोजन केले होते.