रिक्षाचालकाच्या मुलीला 41 लाखांचे पॅकेज, कोल्हापूरच्या अमृता कारंडेची अॅडोब कंपनीत निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते हे कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरातील एका रिक्षाचालकाच्या मुलीने सिद्ध करून दाखवले आहे. अमृता विजयकुमार कारंडे या मुलीची जगप्रसिद्ध अॅडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून निवड झाली आहे. नुकतेच तिला कंपनीकडून याबाबतचे पत्र मिळाले आहे. विशेष म्हणजे कंपनीने तिला तब्बल 41 लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमृता कारंडे ही सध्या कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना अॅडोब कंपनीने ‘C कोडिंग’ ही देशस्तरावरील स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेद्वारे अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड केली होती. त्याकरिता तिला मासिक एक लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली. इंटर्नशिप दरम्यान तिने कठोर मेहनत घेत आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली. त्यानंतर पंपनीने तिला प्री प्लेसमेंटची ऑफर दिली. भविष्यात देशाच्या आयटी आणि संगणकशास्त्र क्षेत्रामध्ये नवनिर्मितीचे योगदान देण्याचे अमृताचे स्वप्न आहे.