
कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले या पठ्ठय़ाने कमाल करून दाखवली आहे. जगप्रसिद्ध टेक कंपनी ऍपलने आयोजित केलेल्या ‘शॉट ऑन आयफोन’ या मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजच्या दहा विजेत्यांची घोषणा नुकतीच ऍपलची वेबसाईट आणि इन्स्टाग्रामवर करण्यात आली आहे. यात दहा जागतिक विजेत्यांमध्ये प्रज्वलने काढलेल्या फोटोची निवड झाली आहे. त्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या प्रज्वलला फोटोग्राफीची खूप आवड आहे. आपल्या आयफोन 13 मधून त्याने कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचे फोटो काढले असून, जाळ्यावरील दवबिंदू मोत्यासारखे चमकत आहेत. त्याच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत प्रज्वल म्हणाला, मी एक निसर्गप्रेमी आहे. पहाटे फिरायला गेल्यावर मोबाईलमधून फोटोग्राफी करायला आवडते. ‘गोल्डन अवर’ हा निसर्गातील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आणतो आणि छायाचित्रकारांना आनंद देतो. अशाच एका पहाटे कोळ्याच्या जाळ्यावरील दवबिंदूंनी माझे लक्ष वेधून घेतले. कोरडय़ा कोळ्याच्या रेशीमने हार कसा तयार केला, ज्यावर दव मोत्यासारखे चमकत होते ते पाहून मी मोहित झालो. हे निसर्गाच्या कॅनव्हासवरील एखाद्या कलाकृतीसारखे मला वाटले.
जागतिक विजेत्यांमध्ये समावेश
ऍपल कंपनीने 25 जानेवारी रोजी या जागतिक स्पर्धेची घोषणा केली होती. तसेच इच्छुकांना 16 फेब्रुवारीपर्यंत फोटो पाठविण्यास सांगितले होते. या स्पर्धेतील अन्य दहा विजेत्यांमध्ये हंगेरी, चीन, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेमधील फोटोग्राफर्सचा समावेश आहे.




























































