
कोल्हापुरात कोरोना बाधित महिलेच्या अंगावरील दागिने उपचारा दरम्यान लंपास करण्यात आल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराणा प्रताप चौक येथील केपीसी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये संबंधित महिला रुग्णाच्या 7 तोळ्याच्या दागिन्याची चोरी झाली आहे. याप्रकरणी सुशीलकुमार विठ्ठल राव बर्गे (रा. सहजीवन परीसर, कदमवाडी) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार बर्गे यांच्या आईला कोरोना संसर्ग झाल्याने उपचारासाठी त्यांना 14 सप्टेंबर रोजी महाराणा प्रताप चौक येथील केपीसी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कर्णफुले व बुगड्या असे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे 7 तोळे वजनाचे दागिने लंपास करण्यात आल्याचा प्रकार काल बुधवारी रात्री उशिरा सुशिलकुमार बर्गे यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केली आहे.
गेल्या आठवड्यात शिवाजी पार्क परिसरातील एका रुग्णालयात मृत पावलेल्या महिलेचे दागिन्यांचीही चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. पुन्हा अशाच चोरीची घटना घडल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

























































