कोल्हापूर जिल्ह्यात चार महिन्यांनंतर दिलासादायक चित्र, 47 पैकी 28 कोविड केअर सेंटर झाली बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेत गेल्या तीन-चार महिन्यांत चिंताजनक बनलेली जिल्ह्याची परिस्थिती आता कुठे दिलासादायक होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदरही कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. साहजिकच त्यामुळे कोविड सेंटर्सची संख्याही कमी होत आहे. आरोग्य प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे आतापर्यंत ग्रामीण व शहरी भागांतील एकूण 47 पैकी 28 कोविड केअर सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याला कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेचा फारसा फटका बसला नाही. मात्र, एप्रिलपासून सुरू झालेल्या दुसऱया लाटेत कोल्हापूरची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड्स न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जिल्ह्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या काळात रुग्णालयांची संख्या अपुरी पडल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर्स रुग्णांसाठी आधार ठरली. आरोग्य प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागात 29 कोरोना केअर सेंटर्स सुरू केली. तर, महपालिकेच्या क्षेत्रात अशी 18 कोरोना केअर सेंटर्स सुरू करण्यात आली होती. दिवसाला अडीच ते तीन हजारांपर्यंत रुग्णांची संख्या वाढली होती. तर, बाधितांच्या मृत्यूंची संख्याही दिवसाला 60 ते 65पर्यंत गेली होती.

सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालल्याचे समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, मृत्यूदरही कमी झाला आहे. आठवडाभरात दैनंदिन बाधितांची संख्या 200 ते 300च्या घरात राहिली आहे, तर मृत्यूंची संख्यासुद्धा 10च्या आत आली आहे. कोल्हापूर महापालिका आणि करवीर, हातकणंगले तालुक्यांत दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दोनअंकी आहे, तर उर्वरित तालुक्यांत 10च्या आत संख्या आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी कोरोना केअर सेंटर्स बंद करण्यात येत आहेत.

शहरात केवळ चार कोविड सेंटर्स सुरू

महापालिका क्षेत्रात 18 पैकी तब्बल 14 कोरोना केअर सेंटर्स बंद झाली आहेत; पण शिवाजी विद्यापीठातील डीओटी, आयसोलेशन, साने गुरुजी कोविड रुग्णालय आणि कसबा बावडा येथील पॅव्हेलियन हॉल अशा चार ठिकाणची कोविड केअर सेंटर्स सुरू ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील 29 पैकी 14 सेंटर्स बंद झाली असून, उर्वरित सेंटर्सबाबत रुग्णांची संख्या पाहून सुरू ठेवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात सध्या करवीर आणि हातकणंगले तालुक्यांत प्रत्येकी दोन आणि प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे कोविड केअर सेंटर्स सुरू असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.