
सर्व कारखानदारांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. त्यांची राहण्याची, खाण्याची तसेच वैद्यकीय सोय करुन माणुसकी जपावी असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. दरम्यान अशा कठीण परिस्थितीत कामगारांना वा-यावर सोडण्याचा प्रकार जर निदर्शनास आला तर संबंधित कारखानदारांविरुध्द फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून आलेले कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. राज्य बंदी, जिल्हा बंदीच्या परिस्थितीत अशा कामगारांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्याची इच्छा असतानाही त्यांना परवानगी देता येत नाही. जिल्ह्यात सध्या तीन साखर कारखाने सुरु असुन दोन दिवसात ते बंद होतील.त्यामुळे संबंधित साखर कारखान्यांनी त्यांच्या कामगारांची त्या-त्या ठिकाणी सोय करावी. एमआयडीसी तसेच इचलकरंजी परिसरात कापड उद्योगांमधील कामगार हे परराज्यातील असले तरी ते त्या ठिकाणी निवासी कामगार आहेत. अशा कामगारांची जीवनावश्यक वस्तुंची सुविधा करण्याचे निर्देश कारखान्यांच्या मालकांना दिले आहेत.
बाहेरुन आलेले पण ज्यांना राहण्याची सुविधा नाही. तसेच जे लॉकडाऊनच्या काळात चालत जिल्ह्यात आलेले आहेत, अशा कामगारां साठी जिल्ह्यामध्ये 17 शिबीरे तालुकास्तरावर सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये 304 व्यक्तींना ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. पण काही ठिकाणी काम संपल्याचे सांगुन कामगारांना बाहेर निघून जाण्यासाठी कारखानदारांकडून प्रवृत्त केले जात आहे. अशा वेळेला वाहन मिळत नसल्याने, असे कामगार पायी चालत निघाले आहेत. हे कायद्याविरोधात आहे. सध्याच्या राज्य व जिल्हा बंदीच्या काळात निश्चितच त्यांना बाहेर काढता येणार नाही. ते माणुुकीला धरून नाही. त्यामुळे अशा प्रसंगी त्या-त्या कारखानदार आणि आस्थापनानी जबाबदारी घेवून त्यांची राहण्याची, अन्न, धान्य, पाणी, वैद्यकीय सुविधा या सर्वांची सोय करणे आवश्यक आहे. याला प्रशासन पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही देसाई यांनी दिली आहे.





























































