यशवंत पंचायतराज अभियानात कोल्हापूर जिल्हा अव्वल यवतमाळ जिल्हा परिषद द्वितीय, तर सिंधुदुर्गला तृतीय पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अतिउत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे 30 लाख, 20 लाख आणि 17 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असा पुरस्कार मिळणार आहे.

यशवंत पंचायतराज अभियान सन 2020-21 (मूल्यांकन वर्ष 2019-20) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी (दि. 12 मार्च) या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.

हसन मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायतराज संस्थांचे योगदान मोठे आहे. पंचायतराज संस्थांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे व त्यांच्यात उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अतिउत्कृष्ट काम करणाऱया जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ पुरस्कार देण्यात येतात. ग्रामपंचायतींसाठी ‘स्मार्ट ग्राम व्हिलेज योजने’अंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायतराज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रीय पडताळणी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय पडताळणी समितीने पुरस्कारांसाठी केलेल्या गुणांकनानुसार 300 गुणांपैकी राज्यस्तरीय अतिउत्कृष्ट जिल्हा परिषदेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेला 276.34, यवतमाळ 274.57, तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला 264.62 गुण मिळाले. तसेच राज्यस्तरीय अतिउत्कृष्ट पंचायत समितीसाठी 300 गुणांपैकी कुडाळ पंचायत समितीला 294.16, कागल 287.30, तर भंडारा पंचायत समितीला 279.45 गुण मिळाले.

एकूण 2 कोटी 69 लाखांचे पुरस्कार

या अभियानांतर्गत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना एकूण 2 कोटी 69 लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

कुडाळ पंचायत समितीला प्रथम पुरस्कार

राज्यस्तरीय अतिउत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय, तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे 20 लाख, 17 लाख आणि 15 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

विभागस्तरीय पुरस्कार

n ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांचीही घोषणा केली. याअंतर्गत कोकण विभागात कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), मालवण (जि. सिंधुदुर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड), नाशिक विभागात राहाता (जि. नगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक), पुणे विभागात कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर), संभाजीनगर विभागात लातूर (जि. लातूर ), नांदेड (जि. नांदेड), शिरूर अनंतपाळ, अमरावती विभागात अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ), तर नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार पटकावले. या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे 11 लाख, 8 लाख आणि 6 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.