
सामना प्रतिनिधी। कोल्हापूर
सत्तेत असलो तरी समाजाशी जाण ठेवण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळेच सत्तेत राहूनही लोकांपुढे जाताना मान खाली जाणार नाही असे काम आपण केले आहे. जनतेच्या हितासाठीच शिवसेना रस्त्यावर उतरली असून शिवसेनेचे हे कार्य घरोघरी पोहोचवून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयाची भगवी पताका फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
लोकसभेची निवडणूक ही पायाभरणी असून पुढील विधानसभेत शिवसेना-भाजपशिवाय दुसरा पक्षच दिसणार नाही असे भगवे वातावरण निर्माण करा, असे आवाहनही दिवाकर रावते यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गटप्रमुख आणि बीएलओंच्या मेळाव्याचे मार्केटयार्ड परिसरातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिवाकर रावते यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, जिल्हाप्रमुख व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, महिला आघाडीच्या शुभांगी पवार, संज्योती मळवीकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासह तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विधानसभा संघटक, शिवसैनिक व युवासैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
लढाऊ शिवसैनिकांचा शिवसेनाप्रमुखांना नेहमीच अभिमान
शिवसैनिकाच्या खिशात पैसे नसले तरी तो अन्यायाविरोधात रस्स्त्यावर उतरतो. तो कधीच फाटका नसतो; तर अन्याय, अत्याचार करणाऱयांना फटके देणारा असतो. अशा लढाऊ शिवसैनिकांचा शिवसेनाप्रमुखांना नेहमीच अभिमान होता. शिवसैनिक निष्ठावंत असल्यामुळेच आज देशात संघटन असलेला शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे एका गटप्रमुखाने किमान शंभर घरांमध्ये शिवसेनेचे काम पोहोचविले तर शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे रावते यांनी सांगितले.

























































