
ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार आहे. याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल तालुक्यातील बामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजनेचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई,जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम मगदूम, अंबरिश घाटगे, उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले, तहसिलदार शिल्पा ठोकडे, भूमि अभिलेख विभागाचे अधीक्षक वसंत निकम,बामणीचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह बामणी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले,शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे गावठाणाचे सीमांकन झाल्यानंतर प्रत्येक नागरीकास त्यांच्या हक्काच्या मालमत्तेचे मालकीपत्रक उपलब्ध होणार आहे. अचुक मालमत्ता मालकीपत्रकामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास कोणतीही समस्या येणार नाही. खरेदी-विक्री, बँक कर्ज, मिळकत हस्तांतर याबाबी सुलभतेने पार पाडण्यास मदत होणार आहे.
तसेच पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोनद्वारे कमी वेळ, कमी श्रम आणि कमी मनुष्यबळाचा वापर करुन ही मोजणी होणार असून,यामध्ये पारदर्शकता व अचुकता असणार आहे. ड्रोनद्वारे गावठाणांचे सीमांकन केल्यामुळे गावठाणातील प्रत्येक घराचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार होईल. गावातील मालमत्तांचे सीमांकन करण्यासाठी ग्रामपंचायतीस येणारा खर्च पंधाराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अबंधीत अनुदानातून (अनटाईड) करण्यास परवानगी दिली जाईल. गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी ग्रामपंचायतीना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.


























































