कोल्हापूरात मत्स्य विभागातील अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मत्स्य व्यवसायातील नुकसान भरपाई मिळवुन दिल्याने, बक्षिस म्हणुन दोन लाखांची लाच स्वीकारताना प्रभारी सहाय्यक आयुक्त-मत्स्य व्यवसाय अधिकारी प्रदिप केशव सुर्वे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार,सन 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे तक्रारदारांच्या संस्थेच्या जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठीच्या जाळ्याचे नुकसान झाले होते. याप्रकरणी महाराष्ट्र शासनाकडून 26 लाखांची नुकसान भरपाई मंजुर झाली होती. हि रक्कम देण्यासाठी सुर्वे यांनी 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. अखेरीस 7 लाखा वरुन 5 लाखांवर तडजोड झाली. यातील पहिल्या हप्त्याची दोन लाखांची लाच तक्रारदाराच्या कार्यालयात स्वीकारताना सुर्वे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पोरे, अजय चव्हाण, मयूर देसाई, रुपेश माने, सुरज अपराध यांच्या पथकाने हि कारवाई केली.