कोल्हापूर – कळंबा कारागृहात आणखी 40 कैदी कोरोना पाॅझीटिव्ह

कळंबा मध्यवर्ती कारागृहासह आयटीआय वस्तीगृहात स्थापन केलेल्या तात्पुरत्या कारागृहात कोरोनाचा सामुहिक संसर्ग वाढु लागला आहे. या दोन्ही ठिकाणी तब्बल 40 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल कारागृह प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कारागृहात कोरोना बाधीत कैद्यांचा आकडा 82 झाला आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

सर्वत्र कोरोनाचा वाढता सामुहिक संसर्ग पाहता, राज्यातील सर्व 65 कारागृहांतील अधिकारी, कर्मचारी व कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाने दिल्या होत्या.या सर्व कारागृहांतील सात वर्षाच्या आतील शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. तर गंभीर गुन्ह्यातील आणि सात वर्षावरील शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृहातच ठेवण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशानुसार दक्षता म्हणून येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. सुरुवातीस बुढ्ढा बराकीतील पाच कैद्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. पाठोपाठ गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी एकाच वेळी 37 कैद्यांचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या कैद्यांच्या संपर्कातील कैद्यांचीही वैद्यकीय तपासणी केली असता बुधवारी रात्री उशिरा तब्बल 40 कैद्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. सध्या कारागृहात एकुण कोरोना बाधितांची संख्या 82 वर पोहोचली आहे.

दरम्यान तात्पुरत्या कारागृहातील कैदी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. या दोन्ही ठिकाणी ही दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या