कर्नाटकी गुळाला कोल्हापूरचे लेबल लावल्यास फौजदारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापुरातील गुळाचे सौदे पूर्ववत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधून येणाऱ्या गुळाला कोल्हापूरचे लेबल लावून विक्री केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या मंगळवारपासून बंद झालेले बाजार समितीमधील गुळाचे सौदे आजपासून पूर्ववत झाले. सकाळच्या सत्रात गुळाला 3 हजार 300 ते 4 हजार 200 रुपये दर मिळाला असून, सुमारे सव्वा कोटीची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे उपसचिव के. बी. पाटील यांनी दिली.

गुळाला 3 हजार 700 रुपये दर मिळावा तसेच कर्नाटकमधून कोल्हापुरी गुळ म्हणून होणारी गुळाची आवक बंद करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून गुळ उत्पादक शेतकऱयांनी गुळाचे सौदे बंद पाडले होते. उत्पादन खर्चही निघत नसल्याने गुळ उत्पादक शेतकरी नाराज झाले होते. याचवेळी कर्नाटकातील गुळाचा ट्रक येथील एका व्यापाऱयाकडे आला होता. त्या गुळाला कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून विक्री होत असल्याचा आरोप करत गुळ उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सौदे पूर्ववत सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासन, गुळ उत्पादक शेतकरी, आडते तसेच व्यापाऱयांची संयुक्त बैठक झाली. यावेळी कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून कर्नाटकी व भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याचा प्रकार चर्चेत आला. त्यामुळे एखादा व्यापारी कर्नाटकचा गुळ कोल्हापूरच्या नावाखाली विकत असेल, तर त्याची आवक-जावक तपासून त्याच्यावर थेट फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले. शिवाय बाजार समितीतील सर्व गुळ व्यापाऱयांची आवक-जावक तपासण्याच्या सूचना देत सौदे पूर्ववत करण्यास सांगितले होते.

दरवर्षी दिवाळीनंतर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत गुळ सौद्यात मंदी दिसून येते. त्यानंतर मकरसंक्रांतीपर्यंत सौद्यात तेजी झाल्याचे दिसते. गेल्या मंगळवारी समितीत नऊ हजार गुळ रव्यांची आवक झाली होती. यामध्ये गुळाला 3 हजार 700 ते 4 हजार 100 दर मिळाला. याचे पाच हजार बॉक्स, तर 3 हजार 300 ते 5 हजारांपर्यंत मिळालेल्या दराचे चार हजार बॉक्स विकले गेले होते. त्यानंतर दहा किलोपासून पुढे गुळाला 3 हजार 700 पेक्षा अधिक दर मिळावा, यासाठी शेतकऱयांनी सौदे बंद केले होते. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर आजपासून गुळाचे सौदे पूर्ववत झाले. सकाळच्या सत्रात तब्बल 14 हजार गुळाचे बॉक्स विकले गेले. यामधून सुमारे एक कोटी दहा लाखांची उलाढाल झाली. सौद्यात गुळाला 3 हजार 300 ते 4 हजार 200 असा दर मिळाला. यातील 60 टक्क्यांहून अधिक गुळ 3 हजार 700 पेक्षा अधिक दराने विक्री झाला.

कर्नाटकच्या गुळाला बाजार समितीत ‘नो एण्ट्री’
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर कोल्हापुरी गुळाच्या नावाने कर्नाटक गुळाची येथून होणारी विक्री रोखण्यासाठी बाजार समितीकडून सर्व गेटवर कर्नाटकी गुळाची वाहतूक करणाऱया वाहनांना ‘नो एण्ट्री’ करण्यात आल्याचेही के. बी. पाटील यांनी सांगितले.