
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ‘कोल्हापूर कस्सं… तुम्ही म्हणशीला तस्सं!’ या नवीन टॅगलाइनसह उमेदवारी यादी जाहीर करण्यापासून ते प्रचारात आघाडी घेतलेले महाविकास आघाडीचे नेते व काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आता कोल्हापूर महापालिका प्रशासकामार्फत महायुतीने केलेल्या बोगस कामगिरीचा पंचनामाच आज पत्रकार परिषद घेऊन केला. यासंदर्भात विविध प्रसारमाध्यमांतून विकासकामांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणाऱया वृत्तांची पुस्तिकाच प्रकाशित करण्यात आली. त्यावरून गेल्या तीन वर्षांपासून शहराच्या झालेल्या दुरवस्थेवर प्रश्नांची सरबत्ती करताना सतेज पाटील यांनी महायुतीवर हल्लाबोल करत कोल्हापूरची निवडणूक ‘कोल्हापूरकर विरुद्ध महायुती’ अशीच लढाई असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीच्या काळात कोल्हापूरची वाताहत झाली, याला जबाबदार हे सरकारच आहे. शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत 100 कोटींच्या रस्त्यांमधील एकही रस्ता पूर्ण नाही; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले की, एका रात्रीत रस्ता होत असल्याचे निदर्शनास आणून देत, ‘या तीन वर्षांत कोल्हापूरकरांना काय दिले? याचे उत्तर कोल्हापूर दौऱयावर येणारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी दिले पाहिजे,’ असे आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी दिले. प्रशासकांवर सरकारचा कंट्रोल होता. पालकमंत्रीही प्रशासकांवर आमचा कंट्रोल असल्याचे म्हणतात, तर मग गेल्या तीन वर्षांत कोल्हापुरात झालेल्या बोगस कामांची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे, असेही सतेज पाटील यांनी सुनावले.कोल्हापूरकारांची धास्ती घेतल्याने महायुती झाली आहे. आता कोल्हापुरात महापालिका निवडणूक ही महायुती विरुद्ध कोल्हापूरकर अशीच होणार असल्याचा पुनरुच्चार करत, जनसुराज्य व राष्ट्रवादी भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचा उल्लेखही आमदार पाटील यांनी यावेळी केला.
महाडिकांनी तारतम्य बाळगावे
खासदार धनंजय महाडिक यांनी ‘काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील,’ असा दावा केला होता. यावर ‘काहीपण बोलताना राज्यसभेच्या खासदारांनी थोडे तारतम्य बाळगायला हवे,’ असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. ‘यांचे ऐकून जर कोल्हापूरकर मतदान करत असतील, तर त्यांचा दोन लाख 70 हजारांनी ‘कार्यक्रम’ झाला नसता,’ अशा शब्दांत सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पलटवार केला.
महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होतात?
मुंबईतील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत, याकडे लक्ष वेधले असता, ‘राज्यात केवळ महायुतीचेच उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात?’ असा प्रतिप्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

























































