तक्रार देऊनही ठेकेदारावर कारवाई न झाल्याने पेटवून घेतले, इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृत जनावरे गाडीला बांधुन ओढुन नेताना अटकाव केल्यानंतर मारहाण करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार देऊनही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याने इंचलकरंजी नगरपालिके समोरच स्वत:ला पेटवून घेतल्याची खबळजनक घटना आज घडली. नरेश सिताराम भोरे (वय – 48, रा. सोलगे, शहापूर रोड, इंचलकरंजी)असे या पेटवुन घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

भ्रष्टाचाराविरोधात नरेश भोरे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आठ दिवसांपूर्वी एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेणा-या अमर लाखे या चालकाला त्यांनी अटकाव केला होता. जनावरे पकडण्याच्या ठेका दिलेल्या, ठेकेदाराबरोबर मृत जनावर ओढत नेण्याऐवजी घंटागाडीत टाकून घेऊन जाण्याची विनंती त्यांनी केली. पण ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी भोरे यांनाच शिवीगाळ व धक्काबुक्की करत मृत जनावर गाडीत टाकण्यास भाग पाडले होते.

दरम्यान, यासंदर्भात इचलकरंजी नगरपालिका अधिकाऱ्यांकडे भोरे यांनी याची तक्रार केली. पण अधिकाऱ्यांनी त्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे शनिवारी भोरे यांनी सोमवारपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा थेट इशारा दिला होता.

तरीसुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर भोरे यांनी नगरपालिकेच्या दारातच पेट्रोल ओतुन स्वतःला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावून गेलेल्या पोलिस व कर्मचा-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पन्नास टक्क्याहुन अधिक भाजल्याने गंभीर अवस्थेत त्यांना सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान काही वेळेतच मोरे यांचा मृत्यू झाला. यामुळे इचलकरंजीत एकच खळबळ उडाली.

यावेळी नातेवाईकांनी धाव घेत संबंधित ठेकेदार, चालक तसेच अधिका-यांवर कारवाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले होते. तर संबंधितांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.