
>> शीतल धनवडे
जबाबदार अधिकारी, अभियंत्यांची कसलीही कमतरता नाही. निधीचाही तुटवडा नाही. ठेकेदार आणि त्यांची यांत्रिक यंत्रणाही मोठय़ा प्रमाणात असली, तरी शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांची अवस्था मात्र दर्जाहीनच दिसत आहे. नवीन रस्ते केल्यानंतर त्यावर पसरण्यात येणाऱया बारीक खडीचा थर आणि धुळीमुळे अपघातांचे प्रमाण पाहाता, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. कंत्राटदारांच्या या नवीन रस्त्यांच्या ‘बनवाबनवी’च्या पद्धतीने, हे रस्ते किती किती दिवस टिकतील, अशी परिस्थिती आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह कायम आहे.
शहरातील रस्ते कितीही तयार केले तरी ते नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. नवीन रस्ता केला की लगेच ड्रेनेज व पाणीपुरवठय़ासह मांडवांच्या खोदाईमुळे खड्डे झालेच. त्यामुळे त्या रस्त्यांची ठेकेदारांकडून गॅरंटी संपल्याचेही चित्र कायमचेच दिसून येते. शिवाय पहिल्याच पावसात रस्त्यांची होणारी चाळण हा प्रकारही नवा राहिला नाही. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे रुग्णवाहिकेतील मृत समजलेल्या व्यक्तीला आदळून मिळालेले जीवनदान असो, की खड्डय़ात जखमी होऊन हात मोडलेल्या युवकाने महानगरपालिकेसमोर केलेले लक्षवेधी आंदोलन असो, यातून राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासनाला जाग आली. शहरासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन रस्त्यांची कामेही सुरू झाली.पण हे नवीन रस्ते महिनाभरातच खराब होण्याची नामुष्की पाहावयास मिळाली. लांबलेल्या पावसावर खापर फोडून आपले अपयश झाकण्याचे प्रयत्न झाले. साहजिकच रस्तेकामातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱयांची चर्चेत राहिलेली टक्केवारी आणि त्यांच्या ठेकेदारांकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
सध्या पाऊस थांबल्याने पुन्हा एकदा शहरात नवीन रस्ते करण्याचा सपाटाच सुरू आहे. पण हे रस्ते करण्यापूर्वी उडविण्यात येणारी धूळ त्यानंतर नवीन रस्त्यांवर अनावश्यक बारीक खडीचा थर पसरविण्यात येण्याची नवीनच पद्धत ठेकेदारांकडून रूढ करण्यात आली आहे. त्याच्या उडणाऱया धुरळ्याने श्वसनाचे विकार वाढले आहेत. त्यात नवीन रस्त्यावर पसरलेल्या बारीक खडीमुळे रस्ता निसरडा होऊन अपघातांचे लहान-मोठे प्रकार वारंवार घडत आहेत. नवीन रस्ते तयार करतानाही बहुतांश ठिकाणी कसलेही नियोजन केले नसल्याने, रस्त्यावर रस्ते असेच प्रकार आहेत. रस्त्यांची उंचीही वाढल्याने असमतोलपणा अधिकच दिसून येत आहे.
अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्याचा प्रकार
– कावळा नाका परिसरातील केलेला रस्ता अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा दिसून येत आहे. यापूर्वी रस्त्यावर डांबर आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात होता. आता डांबराचे प्रमाण अधिक असून, त्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ते झाकण्यासाठीच त्यावर बारीक खडीचा थर पसरविल्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय त्या डांबरावरील खडी सतत ये-जा करणाऱया वाहनांमुळे बाजूला जाऊन या रस्त्यांचा समतोल खालावला आहे. या नवीन रस्त्यांची गॅरंटी ठेकेदार आणि प्रशासनाकडूनही जाहीरपणे देण्याचे धाडस दाखवले जात नाही. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

























































